कोलकाता ; वृत्तसंस्था : बंगालच्या संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. झारखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बंगालने पाचव्या दिवशी 712 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. बंगालच्या दुसर्या डावात भारताचा फलंदाज व पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री मनोज तिवारी याने शतकी खेळी करून बंगालच्या धावसंख्येत अधिकची भर घातली. मनोज हा ममता बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडामंत्रिपदावर आहे.
बंगालने पहिला डाव 7 बाद 773 धावांवर घोषित केला. त्यानंतर झारखंडचा पहिला डाव 298 धावांवर गडगडला. विराट सिंगने 113 धावांची खेळी केली, तर नजिम सिद्दीकीने 53 धावा केल्या. शाहबाज अहमद व सयान मोडल यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.
बंगालच्या दुसर्या डावात आघाडीचे पाच फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मनोज तिवारी व अनुस्तूप यांनी डाव सावरला. अनुस्तूपने 38 धावा केल्या. अभिषेक पोरेलने 34 धावा केल्या. मनोज 179 चेंडूंत 18 चौकार व 2 षटकारांसह 131 धावांवर, तर शाहबाज 35 धावांवर खेळत आहेत. बंगालने 5 बाद 289 धावा करताना 764 धावांची आघाडी घेतली आहे.