

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची (ओबीसी) टक्केवारी जमा करण्यासाठी
सर्वेक्षणास मंगळवारी (दि.7) सुरुवात झाली. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने कर्मचार्यांना (बीएलओ) मोबाईलवर ऑनलाइन नोंदणी करता येत नाही. त्यामुळे काम ठप्प झाले आहे. सर्व्हर व्यवस्थित सुरू झाल्यानंतर नोंदीचे काम केले जाईल, असे अधिकार्यांनी शुक्रवारी (दि.10) सांगितले.
महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणासहित व्हाव्यात म्हणून राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी ओबीसींचा इम्पीरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने पालिकेला ओबीसींचे तोंडी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेने 1 हजार 200 बीएलओ नेमून मंगळवारी (दि.7) काम सुरू केले.
पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार यादीनिहाय आडनावानुसार ओबीसीची नोंद केली जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने एक लिंक दिली आहे. मात्र, राज्यभरात 14 महापालिकेत एकाच वेळी नोंदी केल्या जात असल्याने सर्व्हर डाऊन झाले आहे.
परिणामी, ऑनलाइन नोंद होत नाहीत. बीएलओ कागदावर नोंदी घेत आहेत. सर्व्हर व्यवस्थित सुरू झाल्यानंतर तत्काळ ऑनलाइन नोंदीचे काम पूर्ण केले जाणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
सर्व्हर व्यवस्थित झाल्यानंतर सर्वेक्षण पूर्ण होणार
शहरात ओबीसीची टक्केवारी संकलित करण्याचे काम सुरू आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम शुक्रवारी (दि.10) पूर्ण होऊ शकले नाही. सर्व्हरची अडचण दूर झाल्यास तत्काळ सर्वेक्षण पूर्ण केले जाईल, असे महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.