विमानतळावरील ‘कार्गो’चे स्थलांतर; इमारतीच्या बांधकामामुळे प्रशासनाने निर्णय | पुढारी

विमानतळावरील ‘कार्गो’चे स्थलांतर; इमारतीच्या बांधकामामुळे प्रशासनाने निर्णय

पुणे, पुढारी वृत्तसेवा: लोहगाव येथील पुणे विमानतळावर असलेला कार्गो म्हणजेच मालवाहतुकीच्या विभागाचे येत्या आठवडाभरात स्थलांतर करण्यात येणार आहे. नव्या टर्मिनल इमारतीचे बांधकाम करताना अडचण येत असल्यामुळे विमानतळ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.पुणे विमानतळ प्रशासनाने विमानतळावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथे नवीन टर्मिनल बिल्डिंग उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

हे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्याचा फायदा भविष्यात प्रवाशांना होणार आहे. या कामादरम्यान प्रशासनाला येथील कार्गो विभागाची अडचण होत होती. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने हा कार्गो विभाग येथून हलवून जवळच असलेल्या भारतीय हवाई दलाच्या 1.76 एकर जागेमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात येत्या आठवड्यात विमानतळ अधिकारी आणि हवाई दलाच्या अधिकार्‍यांची बैठक होणार आहे.

पालखी सोहळ्यातील वाहनांची तपासणी करा; ‘आरटीओ’चे आवाहन

त्यानंतर जागा ताब्यात घेऊन मालवाहतुकीसाठी आवश्यक बांधकाम या जागेत करण्यात येईल. जुन्या जागेवरील कार्गो विभाग हलविल्यानंतर विमानतळ प्रशासनाला जुने टर्मिनल आणि नवे टर्मिनल एकमेकांना जोडून एक इमारत उभी करता येईल. त्यामुळे यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्यात येत असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले.

कोरोना लसीची महत्त्वाची वाहतूक

पुणे विमानतळावरून विमानाद्वारे राज्यात आणि संपूर्ण देशात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करण्यात येते. कोरोना काळात तर येथून कोव्हिशिल्ड लसीची वाहतूक करण्यात या विभागाचे मोठे योगदान आहे.

विमानतळावरून वर्षानुसार होणारी मालवाहतूक (मेट्रिक टननुसार)
सन 2014-15 – 27 हजार 390
सन 2015-16 – 31 हजार 766
सन 2016-17 – 35 हजार 312
सन 2017-18 – 27 हजार 300
सन 2018-19 – 31 हजार 700
सन 2019-20 – 34 हजार 645
सन 2020-21 – 41 हजार 566

Nashik : सटाण्यात वीज पडून बैलजोडीचा मृत्यू

पुणे विमानतळावर नव्या टर्मिनल इमारतीचे काम सुरू आहे. जुन्या आणि नव्या टर्मिनल इमारतीच्या मधोमध कार्गो विभाग आहे. हा विभाग दोन्ही टर्मिनल इमारतींना जोडताना अडचण येत आहे. त्यामुळे या विभागाचे स्थलांतर करण्याचा निर्णय आठवडाभरात बैठकीनंतर घेण्यात येणार आहे.

                  – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

Back to top button