पालखी सोहळ्यातील वाहनांची तपासणी करा; ‘आरटीओ’चे आवाहन | पुढारी

पालखी सोहळ्यातील वाहनांची तपासणी करा; ‘आरटीओ’चे आवाहन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा 20 जून रोजी आणि श्री क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 21 जून रोजी सुरू होत आहे. या सोहळ्यात सहभागी वाहनांची तपासणी 16 ते 19 जून या कालावधीत करून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

पालखी सोहळ्यात जड आणि प्रवासी वाहने सहभागी होत असतात. वाहन नादुरुस्त होऊन अपघात होऊ नये, यासाठी वाहनाची पूर्वतपासणी महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने आळंदी रोड येथील चाचणी मैदान, दिवे येथील टेस्ट ट्रॅक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांच्या मोशी येथील कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

वाहन तपासणीच्या वेळी वाहनाची नोंदणी, कर, विमा, प्रदूषण नियंत्रण व योग्यता प्रमाणपत्र, परवाना व वाहतूक परवाना अशी सर्व कागदपत्रे मुदतीत असणे आवश्यक आहे. वाहनाची विनामूल्य तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दिवे कार्यालयात सकाळी 11.30 ते 4.30 आणि आळंदी रोड येथे सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 3 ते 5 यावेळेत तपासणी करण्यात येईल. वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी केले आहे.

Back to top button