पाटस, पुढारी वृतसेवा: वरवंड (ता. दौंड) येथील जुन्या गाड्या खरेदी-विक्री व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी त्यांच्या पत्नीसह आणखी एकाला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. यापूर्वी पोलिसांनी म्हस्के यांच्या अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्राला अटक केली आहे, त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची शुक्रवार (दि. 10) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हा खून करण्यात एकूण चार जणांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली आहे.
वरवंड येथे अल्पवयीन मुलाने माजी सरपंचाचा मुलगा स्वस्तिक खडके याच्या मदतीने बापाचा खून केला असल्याची घटना 27 मे रोजी घडली होती. यवत पोलिसांनी 6 जून रोजी खून उघडकीस आणला. या खून प्रकरणात पत्नीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना येत असल्याने तिची सखोल चौकशी केली असता तिला हा खून केला असल्याची माहिती असून तिने ती लपवली होती व खुनातील पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. तर आरोपी स्वस्तिक खडके याचा मित्र प्रथमेश पंडित (वय 20) यानेही पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मित्र स्वस्तिक खडके यांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. आता पत्नी आणि प्रथमेश पंडित (वय 20 दोघेही रा. वरवंड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.