पिंपरी: हरकती, सूचनांवर 15 जूनपर्यंत सुनावणी | पुढारी

पिंपरी: हरकती, सूचनांवर 15 जूनपर्यंत सुनावणी

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण पुणे (पीएमआरडीए) चा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यावर नागरिकांना सूचना आणि हरकतींसाठी वेळ दिला आहे. सुनावणीसाठी परिसरातील हिंजवडी, मारुंजी, नेरे, जांबे, माण, चांदखेड, चांदे या गावांतील शेतकर्‍यांची आकुर्डीतील कार्यालयात गर्दी होत आहे. या आराखड्यास सप्टेंबर महिन्यात अंतिम स्वरूप मिळणार आहे.

पीएमआरडीए प्रारूप विकास योजना दि. 2 ऑगस्ट 2021 ला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार हरकती आणि सूचनांसाठी नियोजन समिती नियुक्त केली आहे. पीएमआरडीएकडे आलेल्या हरकती, सूचना यांबाबत 15 जूनपर्यंत सकाळी 10 ते 1.30 व दुपारी 2.30 ते 5.00 वाजता सुनावणी सुरू आहे. प्रत्येक गावासाठी एक दिवस देण्यात आला आहे.

पुणे म्हाडातर्फे 5069 सदनिकांची नोंदणी सुरु

आकुर्डी येथील प्राधिकरणाच्या कार्यालयात मंगळवारी मुलखेड, घोटावडे, भेगडेवाडी, गोडांबेवाडी, मातेरेवाडी, भोईरवाडी, चांदे, म्हाळुंगे, चांदखेड या गावांची सुनावणी झाली. सकाळी दहापासूनच नागरिक उपस्थित होते. टोकन देण्यासाठी सकाळी साडेदहाला सुरुवात झाली, त्यानंतर प्रत्यक्ष सुनावणीस सकाळी साडेअकरापासून सुरुवात झाली.

त्यामुळे प्राधिकरणात प्रारूप विकास योजनेवर सूचना उपस्थित राहता येणार आहे. बुधवारी मारुजी, बेबडोहोळ, गुरुवारी हिंजवडी, गोदुबे, साळुंखे, धमाणे, या गावांची सुनावणी घेण्यात आली. सोमवारी नेरे, दत्तवाडी, गहुंजे, मंगळवारी जांबे, दारुबे, सांगवडे आणि बुधवारी शिरगाव या गावांतील हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे.

प्राधिकरण कार्यालय भवनातील पहिल्या मजल्यावर सुनावणी सुरू आहे. टोकन घेऊनही नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. जसे नागरिक बाहेर येतील तसे इतर नागरिकांना आत सोडण्यात येत होते. हरकत सादर केलेल्या अर्जदारास सुनावणीबाबतची माहिती कळविली आहे. रजिस्टर्ड पोस्टाद्वारे व एसएमएसद्वारे कळविले आहे.

Back to top button