पिंपरी: मावळातील गट, गण रचनेबाबत केवळ एकच हरकत | पुढारी

पिंपरी: मावळातील गट, गण रचनेबाबत केवळ एकच हरकत

गणेश विनोदे

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यामध्ये नव्याने झालेल्या रचनेमुळे मोठ्या प्रमाणात बदल झाला असल्याने या गट, गण रचनेबाबत बरीच चर्चा रंगली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र संपूर्ण तालुक्यात केवळ एकच हरकत दाखल झाल्याने ही चर्चा केवळ चर्चाच राहिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी प्रसिद्ध केलेल्या जिल्हापरिषद व पंचायत समिती प्रभाग रचनेमध्ये मावळ तालुक्यात एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गणांची संख्या वाढली असून पूर्वीच्या सर्वच गट व गणांची रचना बदलली आहे. तर फक्त चांदखेड – काले हा गट वगळता इतर सर्व गटांची नावेही बदलली आहेत.

या गट, गण रचनेमुळे पूर्वीच्या गट व गणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले असून प्रामुख्याने मोठी मतदारसंख्या असलेली गावे पूर्वीचा गट, गण सोडून दुसर्‍याच गट गणामध्ये गेली. त्यामुळे इच्छुकांच्या वर्षभरापासून सुरू असलेल्या तयारीवर पाणी पडले. त्यामुळे या गट, गण रचनेबाबत असंख्य तक्रारी दाखल होतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही, केवळ एकच हरकत दाखल झाली आहे. प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर प्रामुख्याने सोमाटणे – कुसगाव या जिल्हा परिषद गटाबाबत उलटसुलट चर्चा रंगली होती.

भाषा भिन्न परंतु देश मात्र एकच : महंत भास्करगिरी महाराज

कारण हा जिल्हा परिषद गट तालुक्याचे पूर्वेकडील सोमाटणे गावापासून पश्चिमेकडे असलेल्या कुसगाव गावापर्यंत जोडला गेला आहे. यामध्ये सोमाटणे पंचायत समिती गणातील कडधे, करूंज, बेडसे, बौर, ब्राम्हणवाडी, शिवणे, सडवली, ओझर्डे, उर्स, आढे, परंदवडी, सोमाटणे ही गावे तर कुसगाव बु पंचायत समिती गणातील कुसगाव बु, आपटी, गेव्हंडे आपटी, दुधीवरे, आतवण, लोहगड, महागाव, धालेवाडी, मालेवाडी, सावंतवाडी, प्रभाचीवाडी, आंबेगाव, माजगाव, शिंदगाव, पानसोली, पाले पमा या गावांचा समावेश होता.

पूर्वी हे दोन गणांचा एकत्रित समावेश नव्हता, त्यामुळे संबंधित गावांचा किंवा तेथील राजकीय पदाधिकारी यांचाही एकमेकांशी संबंध येत नव्हता, आता मात्र ही गावे व तेथील राजकीय पदाधिकारी या नवीन गटामुळे नव्याने जोडले जाणार असल्याने या गटातील उमेदवारांना विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे या गटाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या, हरकत मात्र आली नाही.

हीच परिस्थिती इतर गट, गणांमध्ये निर्माण झाली आहे, इतर ठिकाणी मोठा बदल झाला नसला तरी हक्काची गावेच दुसर्‍या मतदारसंघात गेल्याने इच्छुकांची कोंडी झाली, आतापर्यंत केलेला खर्च वाया गेला, काहींना तर लढण्यासाठी मतदारसंघच राहिला नाही अशी अवस्था झाली. त्यामुळे सर्वच पक्षाच्या इच्छुकांचा हिरमोड झालेला दिसला, परंतु हरकती मात्र आल्या नाही. त्यामुळे नव्याने झालेल्या गट गण रचनेबाबत खरच तक्रारी होत्या की, सर्व पक्षाच्या इच्छुकांना ही रचना पोषक आहे. म्हणून तक्रारी आल्या नाही हे एक कोडेच झालेच आहे.

बार्टी आता 300 जणांना देणार मोफत प्रशिक्षण

तळेगाव ग्रामीण गण; हे नाव कसे?

दरम्यान, नवीन गट, गण रचनेनुसार माळवाडी, तळेगाव ग्रामीण, गहुंजे, शिरगाव, गोडुंब्रे, धामणे, साळुंब्रे, दारूंब्रे, सांगावडे या गावांचा समावेश असलेला तळेगाव ग्रामीण गण तयार झाला असून या गणाचा समावेश असलेला इंदुरी – तळेगाव ग्रामीण गट तयार झाला आहे. वास्तविक तळेगाव दाभाडे हे मोठे शहर असून या शहरासाठी स्वतंत्र नगरपरिषद आहे. तसेच या नवीन गणामध्ये इतर 8 मोठी गावेही आहेत, मग या गणाला तळेगाव ग्रामीण हे नाव कसे ? असा प्रश्न संबंधित गावांसह मावळवासीयांना पडला असून हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Back to top button