भाषा भिन्न परंतु देश मात्र एकच : महंत भास्करगिरी महाराज | पुढारी

भाषा भिन्न परंतु देश मात्र एकच : महंत भास्करगिरी महाराज

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : आपण ज्या देशात राहातो तो देश आपला स्वाभिमान व वैभव आहे. आपला भारत देश सर्व जाती, धर्म व भाषांमध्ये विखुरलेला आहे. अनेक भाषा, वेश, खानपान व उपासना भिन्न आहेत, परंतु देश मात्र एकच असल्याचे सर्वधर्मियांनी लक्षात घेणे महत्त्वाचे असल्याचे उद्गार श्रीदत्त देवस्थान देवगड संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.

श्रीरामपूर येथील सरस्वती कॉलनीमधील हनुमान मंदिरात जय श्रीराम युवक मंडळ व हनुमान मंदिर भजनी मंडळ यांचे वतीने श्री दत्त मूर्ती पुन:प्रतिष्ठापना भास्करगिरी महाराज यांचे हस्ते करण्यात आली. त्यावेळी प्रवचन प्रसंगी ते भाविकांना उपदेश करताना बोलत होते. महंत भास्करगिरी महाराज म्हणाले, या देशाची संस्कृती आपल्याला श्रद्धेने मिळालेली आहे.

संस्कार आपल्या पूर्वजांनी श्रद्धेने दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त झाले आहे. ‘उच्चार’ आणि ‘विचार’ हे सदैव एकाच छत्राखाली येण्यासाठी आपल्याला आचार योग्य ठेवणे महत्त्वाचे आहे. भगवान दत्तात्रेय आपल्याला त्रिमुखातून विचार, आचार आणि उच्चार या तिन्ही गोष्टींचा सदैव संदेश देतात. प्रत्येकाने आपल्या घरात ग्रंथ, देव-देवता, शूरविरांचे फोटो ठेवले पाहिजेत. त्यामुळे युवा पिढीवर चांगले संस्कार होतात, असे त्यांनी सांगितले.

वाढत्या संसर्गामुळे प्रशासन सतर्क; दुसरा डोस शिल्लक असलेल्यांचा शोध सुरू

सरस्वती कॉलनी व परिसरात माजी नगरसेवक आशिष धनवटे व त्यांचे सहकारी सामाजिक, विधायक व धार्मिक क्षेत्रात अतिशय चांगले काम करीत असल्याबद्दल त्यांनी यावेळी कौतुक केले. प्रारंभी भास्करगिरी महाराज यांची रथातून शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर माजी नगरसेवक आशिष धनवटे यांच्या निवासस्थानी परिवाराच्या वतीने संतपूजन करण्यात आले. सरस्वती कॉलनी परिसरात ठिकठिकाणी सडा, रांगोळी, पताका व फटाक्यांची आतिषबाजीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

प्रवचन कार्यक्रमप्रसंगी ह.भ.प. प्रभाकर कावले महाराज, तुकाराम कदम महाराज, गोपाल कावले महाराज, कर्डिले महाराज, बहिरट महाराज, जानू महाराज, मनोज पवार तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, मुळा- प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, बाबासाहेब दिघे, मंजुश्री मुरकुटे, भारती कांबळे, संगीता मंडलिक, दीपाली ससाणे, अण्णासाहेब सदाफळ, संजय छल्लारे, प्रसाद चौधरी, अ‍ॅड. प्रमोद वलटे, अ‍ॅड. दीपक बारहाते, नानासाहेब तांबे, दीपक निंबाळकर, मनोज लबडे, सुनील गुप्ता, कल्याण कुंकूलोळ, पत्रकार बाळासाहेब भांड, सुरेश कांगुणे, प्रकाश कुलथे यांच्यासह भाविक व सरस्वती कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ, तर स्वागत व प्रास्ताविक अ‍ॅड.अजय धाकतोडे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार नितीन शिरसाठ यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला.

Back to top button