मुसळधार पावसाने कळंब येथे शेकडो एकर ऊस भुईसपाट | पुढारी

मुसळधार पावसाने कळंब येथे शेकडो एकर ऊस भुईसपाट

महाळुंगे पडवळ : पुढारी वृत्तसेवा

पुणे-नाशिक रस्त्यालगत कळंब, गणेशवाडी (ता. आंबेगाव) येथील ऊस उत्पादकांचा शेकडो एकर ऊस भुईसपाट झाला. कळंब परिसरात पूर्वहंगामी मुसळधार पाऊस दि. 7 व दि. 8 रोजी पडला. सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाचे सुमारे दीड तास आगमन झाल्याने शेतकरी काहीसा सुखावला आहे. पहिल्याच पावसाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

कळंब, गणेशवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी माजी सरपंच संग्राम गणपतराव फुलवडे यांचे सुमारे आठ एकर क्षेत्रांतील रस्त्यालगत असलेला ऊस भुईसपाट झाला आहे. विघ्नहर व भीमाशंकर साखर कारखान्याचे कर्मचारी, कळंब बीटप्रमुख संजय थोरात, भास्करराव सैद, संदीप घेवडे, अजय येवले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन शेतकर्‍यांची विचारपूस केली.

बारा ते पंधरा कांड्यावर ऊस वाढ झाल्याने वार्‍यामुळे ऊस पडला. यामुळे उसाच्या वजनात घट येणार नाही, शेतकर्‍यांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे संजय थोरात यांनी सांगितले. पूर्वहंगामी पावसाने भुईसपाट झालेल्या उसाची महसूल विभागाने पाहणी करावी, अशी मागणी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष शिवाजीराव भालेराव यांनी केली आहे.

हेही वाचा

‘त्या’ खूनप्रकरणी चार जणांना अटक, बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

सततच्या वाईट स्वप्नांनी कंपवाताचे मिळतात संकेत

अल्वेज अ स्टनर!

Back to top button