सततच्या वाईट स्वप्नांनी कंपवाताचे मिळतात संकेत | पुढारी

सततच्या वाईट स्वप्नांनी कंपवाताचे मिळतात संकेत

लंडन : जर 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वृद्ध लोकांना दीर्घकाळापासून सतत वाईट स्वप्नं पडत असतील तर ते पार्किन्सन म्हणजेच कंपवाताचे शिकार ठरू शकतात. बर्मिंघम युनिव्हर्सिटीचे न्यूरोलॉजिस्ट आबिदेमी ओटाइकू यांनी याबाबतची माहिती दिली आहे. संपूर्ण जगात सुमारे 40 लाख लोकांना कंपवात असून दर एक लाख माणसांमध्ये तेरा जणांना हा विकार असतो.

ज्यावेळी या आजाराचे निदान होते तोपर्यंत संबंधित व्यक्तीने आपल्या मेंदूतील 60 ते 80 टक्क्यांपर्यंतचे डोपामाईन-रीलिजिंग न्यूरॉन गमावलेल्या असतात. त्यामुळे वयस्कर लोकांना, विशेषतः पुरुषांना त्यांच्या स्वप्नांबाबत विचारून किंवा त्यांच्या शरीराच्या भागांच्या हालचाली पाहून पार्किन्सनच्या सुरुवातीच्या लक्षणांचा छडा लावता येऊ शकतो. सतत वाईट स्वप्नं पडत असतील तर हा आजार वाढण्याचा धोका दुप्पटीने वाढतो.

या आजाराची पुष्टी करण्यासाठीच्या चाचण्या अतिशय महागड्या असतात. त्यामुळे स्वप्नांमुळेही त्याची माहिती मिळणे हा एक सोयीचा मार्ग ठरू शकतो. पार्किन्सनचे एक चतुर्थांश रुग्ण हे वाईट स्वप्नांची शिकार असतात. काही रुग्णांना तर दहा वर्षांपासून अशा वाईट स्वप्नांनी छळलेले असते. पार्किन्सनने ग्रस्त असलेल्या पुरुषांना महिलांच्या तुलनेत अधिक वाईट स्वप्नं पडतात. महिलांना सुरुवातीच्या जीवनापासूनच वाईट स्वप्नं पडण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असते. पुरुषांमधील वाईट स्वप्नांची सुरुवात हे न्यूरोडिजनरेशनचा संकेतही असू शकतो.

Back to top button