पुणे : साखर दरात पुन्हा क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ | पुढारी

पुणे : साखर दरात पुन्हा क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ

पुणे ; पुढारी वृत्तसेवा :  साखर दरात वाढ  साखर व्यापारात सट्टेबाजांच्या सक्रिय सहभागामुळे कारखान्यांवरील साखरेची विक्री आता वाढीव दराने होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचा परिणाम घाऊक बाजारातही साखरेचे दर क्विंटलमागे पुन्हा शंभर रुपयांनी वाढले असून शनिवारी एस 30 ग्रेड साखरेचा भाव 3400 ते 3450 रुपयांवर पोहोचला आहे.

साखर दरात वाढ  केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी 21 लाख टन साखरेचा कोटा खुला केला आहे. मागणीच्या तुलनेत जाहीर करण्यात आलेला कोटा अपुरा असल्याने साखरेचे भाव तत्काळ पन्नास रुपयांनी वाढून 3300 ते 3350 रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतरही ही वाढ सुरूच राहिली असून, पुन्हा शंभर रुपयांनी वाढ झाली.

साखरेचे भाव 3400 ते 3450 रुपयांवर

आता साखरेचे भाव 3400 ते 3450 रुपयांवर पोहोचल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तर किरकोळ बाजारात साखर विक्रीचा किलोचा दर 35 ते 36 रुपयांवर पोहोचल्याचे सांगण्यात आले.

साखरेची विक्री क्विंटलला 3100 रुपये दराने करण्याचे कायदेशीर बंधन आहे. मात्र, कारखान्यांवर साखर विक्री 3100 ते 3150 रुपयांवर पोहोचली. त्यामध्ये आता आणखी वाढ होत 3200 रुपयाच्या आसपास साखर विक्री कारखान्यांवरच सुरू झालेली आहे.

एकीकडे घाऊक बाजारात साखरेला मागणी साधारणच असताना साखरेची होणारी दरवाढ सध्या चर्चेत आलेली आहे.

उत्तर प्रदेश निवडणूक कनेक्शन?

उत्तरप्रदेशमधील कारखान्यांकडून उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची सर्वाधिक रक्कम देणे बाकी आहे.

थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत देण्यास वाढीव दरवाढीचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कारण पुढील वर्षांच्या सुरुवातीस उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूकही होणार आहे.

तत्पूर्वी तेथील शुगर लॉबीकडून थकीत एफआरपीची रक्कम शेतक-यांना देण्यास प्राधान्य देण्यावरही भर दिला जात असल्याचा सूर साखर वर्तुळात चर्चिला जात आहे.

हेही वाचलं का ?

Back to top button