पिंपरी: सीडीएस परीक्षेत आदित्य देशात 20 वा | पुढारी

पिंपरी: सीडीएस परीक्षेत आदित्य देशात 20 वा

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात आलेल्या कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेत वडगाव मावळ येथील आदित्य विवेक गायकवाड याचा देशात 20 वा क्रमांक आला असून, आदित्यच्या या यशाने वडगावच्या नावलौकिकात भर पडली आहे.
ही परीक्षा पदवीनंतर संरक्षण दलात रुजू होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतली जाते.

या परीक्षेच्या माध्यमातून तरुणांना लष्कराच्या तिन्ही दलांत अधिकारी होण्यासाठीची संधी मिळते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना ‘एसएसबी’ मुलाखतीसाठी बोलवले जाते. या मुलाखतीत विविध प्रकारच्या चाचण्यांनंतर त्यांची वैद्यकीय चाचणी होते. त्यानंतर मूळ प्रवेश परीक्षा, मुलाखत व वैद्यकीय चाचणी या तिन्ही गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम राष्ट्रीय गुणवत्ता श्रेणी (रँकिंग) ठरते व अंतिम प्रशिक्षणासाठी निवड होते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने सीडीएस परीक्षेचा निकालांची नुकतीच घोषणा केली. यामध्ये आदीत्य गायकवाड देशात 20 वा आला आहे. संरक्षण दलात अधिकारी होण्यासाठी प्रवेश परीक्षा ही अत्यंत अवघड मानली जाते. मात्र, आदीत्यने सीडीएस परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. यावर्षी देशभरातून जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश परिक्षा दिली होती.

पिपरी: आदर्श कॉलेज, जैन कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के

त्यापैकी साडेचार हजार विद्यार्थी लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले. यापैकी केवळ 142 विद्यार्थांची निवड झाली आहे. आदित्यने औरंगाबादच्या देवगिरी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरींग अँड मॅनेजमेंट स्टडीज येथे बी टेक पदवी घेतली आहे. वडगाव मावळ येथे लहानाचे मोठे झालेले आदित्यचे वडील कर्नल विवेक गायकवाड हे सध्या आसाम येथे कर्तव्यावर आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य याने कुठल्याही शिकवणीविना हे मिळवले आहे. इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आदित्य भारतीय नौदल अकादमीमध्ये कार्यकारी शाखेत रुजू होणार आहे. कमिशनिंग झाल्यावर तो सशस्त्र दलातील त्यांच्या कुटुंबातील दुसर्‍या पिढीतील अधिकारी असणार आहे.

बी टेक पदवी प्राप्त केल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासासाठी जर्मनी येथील स्कॉलरशिप सोडून आदित्यने देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करत यश प्राप्त केले असून, नेव्हल पायलट होणे हे आदित्यचे स्वप्न आहे.

                       – कर्नल विवेक गायकवाड, आदित्यचे वडील

Back to top button