सासवड : पुढारी वृत्तसेवा
गेल्या पाच वर्षांपासुन सासवड शहर व परिसरात वेगवेगळ्या प्रकारे दहशत माजवत असलेल्या गुंड अतीश दळवी याला दोन वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. दळवीबाबत सार्वजनिक शांततेचा भंग होऊन सार्वजनिक मालमत्ता व लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे दिसुन येत असल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्यास आळा बसविण्यासाठी तसेच सामान्य जनतेला होत असलेल्या त्रासातून प्रतिबंध व्हावा यासाठी ही कारवाई करण्यात आली.
उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी अतीश दळवी यास पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे सादर केला होता. त्याची सुनावणी झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी यांनी गुंड अतीश पांडुरंग दळवी (रा. जेजुरी नाका, सासवड) याला मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 56 (ब) अन्वये पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
तडीपार गुंड दळवी हा पुणे जिल्ह्याच्या हद्दीत कोणास आढळल्यास तत्काळ सासवड पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी केले आहे.