मावळ राष्ट्रवादीला अजित पवारांनी दिली जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदाची खुली ऑफर !

मावळ राष्ट्रवादीला अजित पवारांनी दिली जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदाची खुली ऑफर !
Published on
Updated on

गणेश विनोदे

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकांसाठीची धुरा आमदार सुनील शेळके यांच्याकडेच असेल असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकप्रकारे प्रमुख विरोधक असलेल्या भाजपला खुले आव्हान देऊन पक्षांतर्गत बंड करणार्‍यांना चांगलीच चपराक दिली आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत बोलत असताना त्यांनी आगामी निवडणुकांबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. मावळमध्ये जिल्हापरिषदेच्या सहा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी तसेच लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषदांसाठी लवकरच निवडणुका होणार असून वडगाव नगरपंचायतची निवडणूकही वर्षभराने होणार आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गेली 25 वर्षे मावळ तालुक्यात पक्षाचा आमदार नव्हता, जिल्ह्यात सगळीकडे चांगले वातावरण असताना मावळात आमदार नाही ही खंत कायम होती. परंतु, सुनील शेळके यांच्या रूपाने तालुक्याला एक दमदार आमदार मिळाला आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील पक्षाची घौडदौड, संघटनात्मक बांधणी याबरोबरच तालुक्यातील अनेक वर्षांपासून रखडलेला विकास झपाट्याने पूर्ण होताना दिसत आहे.

याचाच प्रत्यय म्हणून देहू नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीला एकहाती यश मिळाले, देहूच्या या यशाची पुनरावृत्ती इतर निवडणुकांमध्येही होणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्यात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका कुठलीही स्थानिक आघाडी न करता देहूप्रमाणे पक्षाच्या चिन्हावरच लढवाव्यात अशी सक्त ताकीद दिली. याशिवाय, या निवडणुकांची धुरा आमदार सुनील शेळके यांच्याकडेच असेल, निवडणुकीचे चिन्ह फक्त घड्याळच असेल असे स्पष्ट करत शेळकेंच्या मागे मी स्वतः आहे आणि माझ्यामागे खुद्द शरद पवार आहेत. त्यामुळे कोणीही स्थानिक पातळीवर कुठलीही गडबड करु नये असा सज्जड दमही यावेळी बोलताना दिला.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे केवळ स्वार्थासाठी पक्षांतर्गत राजकारण करणार्‍यांना, उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी किंवा पक्षांतर्गत कुरघोडी करणार्‍यांना चांगलीच चपराक बसली आहे. तसेच, यानिमित्ताने एकप्रकारे प्रमुख विरोधक असलेल्या भाजपलाही खुले आव्हान दिले आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदाचीही दिली खुली ऑफर !

जिल्हापरिषदेच्या सर्व जागा व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून सत्ता मिळवली तर जिल्हापरिषद मधील अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार समित्यांचे सभापती या सहा प्रमुख पदांपैकी एक प्रमुख पदाची मावळला पुन्हा एकदा संधी देणार असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर करून मावळातील राष्ट्रवादीला खुली ऑफर दिली आहे.

आमदार शेळकेंनीही उपमुख्यमंत्र्यांना दिला 'खुला' शब्द !

आमदार सुनील शेळके यांनीही यावेळी बोलताना देहूच्या धर्तीवरच मावळातील निवडणुका जिंकण्याचा विश्वास व्यक्त करताना लोणावळा व तळेगाव दाभाडे या दोन्ही नगरपरिषदांचे नगराध्यक्ष राष्ट्रवादीचेच असतील. जिल्हापरिषद, पंचायत समितीमध्ये विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत, त्या सर्व जागांवरही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल व सभापतीही राष्ट्रवादीचाच असेल असा खुला शब्द उपमुख्यमंत्र्यांना दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news