कीटकजन्य आजारांबाबत काळजी घेण्याचे आवाहन | पुढारी

कीटकजन्य आजारांबाबत काळजी घेण्याचे आवाहन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियासारखे आजार पसरू नयेत म्हणून वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असते. यासाठी डासोत्पत्ती आजाराबाबतची माहिती महापालिका नागरिकांपर्यंत पोहचवून जनजागृती करत आहे. नागरिकांनीही महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

पावसाळ्यात घराच्या अंगणात किंवा गच्चीवर टाकलेल्या भंगार मालात पाणी साचते. हे पाणी फेकून देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामध्ये डासांची वाढ होते. हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया या रोगाचा प्रसार वाढू नये म्हणून डास उत्पत्तीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी खालील दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आहे.

घरात पाणी साठविण्याची सर्व भांडी रिकामी करुन स्वच्छ करावयाची आहेत.

त्यानंतर त्यात पाणी भरावे. घरातील मोठ्या टाक्या रिकाम्या करता येणे शक्य नाही त्यांना घट्ट झाकण बसवायचे आहे.

घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावायची आहे.

घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रिजचा खालच्या ट्रे मधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावयाचे आहे.

घराभोवती पाण्याची डबकी असतील तर ती बुजविणे किंवा पाणी वाहते करणे याबाबत दक्षता घ्यावी.

Back to top button