सांगवी : पुढारी वृत्तसेवा
सरकारी विकासकामे अतिशय उत्कृष्ट होण्यासाठी सदैव दक्ष असलेल्या आणि त्यासाठी प्रत्येक कामाची बारकाईने पाहणी करून अधिकारी व ठेकेदारांना जागेवरच नीट करणार्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील सांगवी येथील एका ओढ्यावरील एक कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असताना तक्रार करूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेतली जात नव्हती.
संबंधित ठेकेदाराने या पुलाचे काम रेटून नेण्याच्या मानमानीमुळे संतप्त ग्रामस्थांनी पुलावर जात हे काम बंद पाडल्याचा प्रकार शनिवारी (दि. 4) घडला. सांगवीहून कांबळेश्वरकडे जाणार्या रस्त्यावर सांगवी गावाशेजारीच मोठा ओढा आहे. या ओढ्यावर पुलाच्या बांधकामासाठी पूरनियंत्रण योजनेतून सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
सुरवातीपासूनच हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार ग्रामपंचायत प्रशासनाने केली होती. ठेकेदाराने भूमिगत गटार योजनेच्या चेंबरवरच मुरमीकरण केले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठडे न बांधता डांबरीकरण करण्याचा घाट घातला जात आहे.
संबंधित ठेकेदाराने पुलाच्या कामात सुधारणा न करता काम रेटून नेण्याचा सपाटा लावल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पुलावर जात जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने काम बंद पाडले.
या वेळी बारामती दूध संघाचे संचालक प्रकाशराव तावरे, सरपंच चंद्रकांत तावरे, उपसरपंच अनिल काळे, शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे विश्वस्त महेश तावरे यांच्यासह ग्रामस्थांनी सांगितले की, या कामाकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालण्याची मागणी करून जर कामात सुधारणा झाली नाही, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा