सोलापूर : महिन्यात मोजणी, 6 महिन्यांत भूसंपादन : जिल्हाधिकारी | पुढारी

सोलापूर : महिन्यात मोजणी, 6 महिन्यांत भूसंपादन : जिल्हाधिकारी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : 
सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉरच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या महिन्याभरात मोजणी करून सहा महिन्यांत प्रत्यक्षात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर यांनी व्यक्त केला आहे. या कामाचा जिल्हाधिकारी दररोज अपडेट घेत आहेत. त्यामुळे कामाला गती आली आहे.

गत महिन्यात या संदर्भातील राजपत्र जाहीर करण्यात आले होते तसेच या भूसंपादन प्रक्रियेवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यावर तीन तालुक्यांतून जवळपास 131 हरकती दाखल झाल्या. त्यावर येत्या मंगळवारपासून सुनावणी घेण्यात येणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने हा महामार्ग राज्यमार्ग ठरणार आहे. त्यासाठीच्या विविध कामांना गती देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आता चांगलीच कंबर कसली आहे.

जिल्ह्यातील बार्शी, उत्तर, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या चार तालुक्यांतील जवळपास 51 गावांतून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. जवळपास दीडशे किलोमीटर लांबीच्या या महार्गासाठी शासन किती हेक्टर जमीन ताब्यात घेणार, हे मोजणी केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मोजणीसाठी खास कर्मचार्‍यांची पथके नेमण्यात आली आहेत. या कामांमध्ये कोणीही हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. सर्वाधिक तक्रारी या बार्शी तालुक्यातील दाखल झाल्या असून, त्या ठिकाणी 102 शेतकर्‍यांनी जिल्हा प्रशासनाकडे दावा दाखल केला होता.त्यावर भूसंपादन अधिकारी अरुणा गायकवाड यांनी संबंधितास बोलावून सुनावणी घेऊन ही प्रकरणे निकाली काढल्याची माहिती त्यांनी
दिली.

शेतकर्‍यांच्या शंकाचे निरसन करण्यात येणार, तसेच कोणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
– अरुणा गायकवाड
भूसंपादन अधिकारी, सोलापूर

Back to top button