वाढदिवसाला पार्टी देणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा, हॉटेलचालकासह ३० जणांवर कारवाई | पुढारी

वाढदिवसाला पार्टी देणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा, हॉटेलचालकासह ३० जणांवर कारवाई

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा

सिंहगड पश्चिम हवेली भागात डीजे लावून बेकायदेशीर पार्ट्या करणाऱ्यांविरोधात हवेली पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर (ता. हवेली) येथे मध्यरात्री सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या हाॅटेलचालकांसह ३० जणांविरोधात हवेली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार सोमवारी २जून रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.

खानापूरजवळील ‘हाॅटेल सिंहगड फोर्ट व्ह्यू’समोरच्या पटांगणात बेकायदेशीर पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य पाहून मोठ्या पोलिस फौजफाट्यासह हवेली पोलिस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी तेगबीरसिंह संधू यांच्या पथकाने वाढदिवसाच्या पार्टीवर धाड टाकली. याप्रकरणी खडकवासला येथील सराईत गुन्हेगार रामदास चंदू सोनवणे, हाॅटेलचालक आत्माराम जावळकर (रा. खानापूर), मिनाज शेख, चंकी कांबळे (रा. खडकवासला), रॉबिन उपेद्र कांबळे (रा. नांदेड फाटा), अफिद्र पिल्ले (रा. नांदेड गाव) व रवी दत्तात्रय पंधरकर (रा. उत्तमनगर) तसेच इतर २५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणासही अटक केले नाही.

मेट्रोच्या भुयारी मार्गाचे खोदकाम अखेर संपले..! बुधवार पेठ मेट्रो स्टेशन येथे शनिवारी झाला शेवटचा ‘ब्रेक थ्रू’..

याबाबत हवेली पोलिसांनी सांगितले की, ‘हाॅटेल सिंहगड फोर्ट व्ह्यू’समोरच्या पटांगणात सराईत गुन्हेगार रामभाऊ सोनवणे याच्या वाढदिवसाची बेकायदेशीर पार्टी मध्यरात्री सुरू होती. जमावबंदीचे आदेश लागू असताना परवानगी न घेता ही पार्टी सुरू होती. बेकायदा जमाव जमवून डीजेच्या जोरदार आवाजाने उपद्रव सुरू होता. हॉटेलमालक आत्माराम जावळकर याच्याकडे हॉटेल चालविण्याचा परवानाही नसताना रात्री उशिरापर्यंत हाॅटेल सुरू होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

Back to top button