मेट्रोच्या भुयारी मार्गाचे खोदकाम अखेर संपले..! बुधवार पेठ मेट्रो स्टेशन येथे शनिवारी झाला शेवटचा ‘ब्रेक थ्रू’.. | पुढारी

मेट्रोच्या भुयारी मार्गाचे खोदकाम अखेर संपले..! बुधवार पेठ मेट्रो स्टेशन येथे शनिवारी झाला शेवटचा ‘ब्रेक थ्रू’..

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात काही वर्षापूर्वी सुरू झालेले पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचे खोदकाम अखेर शनिवारी संपले. शनिवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास स्वारगेट मेट्रो स्थानकातून खोदकाम करत निघालेले ‘पवना’ मशीन बुधवार पेठ स्थानकात बाहेर पडले अन शेवटच्या टप्प्यातील ‘ब्रेक थ्रू’ झाला.

महामेट्रो प्रशासनाने पहिल्या टप्प्यातील वनाज ते गरवारे मेट्रोचे काम पूर्ण करून मेट्रो ट्रेन सुरू केली आहे. त्यामुळे आता मेट्रो प्रशासनाकडून उर्वरित कामे आता युध्द पातळीवर करण्यात येत आहेत. यातीलच कृषिमहाविद्यालय ते स्वारगेट दरम्यान टिबीएमद्वारे (टनेल बोअरिंग मशिन) सुरू असलेले मेट्रोच्या भुयारी मार्गाचे खोदकाम शनिवारी पुर्ण झाले. त्यामुळे येथे मेट्रो अधिकारी, कर्मचार्‍यांनी या ऐतिहासिक क्षणाचे फटाके वाजवून स्वागत करत जल्लोष केला.

पुणे मेट्रोच्या बोगद्याचे काम अत्यंत अचूक आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने करण्यात आले. ही अंतिम प्रगती 12 किमी बोगदा मार्ग पूर्ण झाल्याची खूण आहे. महा मेट्रोसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. पुण्यातील नागरिक आणि प्रशासकीय संस्थांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय पुणे मेट्रो प्रकल्पाच्या भूमिगत मार्गाचे काम वेगाने आणि यशस्वीपणे पूर्ण झाले नसते. राहिलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महा मेट्रो कटिबद्ध आहे.
– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महा मेट्रो

Back to top button