
आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा
बेल्हे (ता. जुन्नर) येथील हौदबाग परिसरात शनिवारी ४ जून रोजी विहिरीत पडलेल्या बिबट्यास वनविभागाने रेस्क्यू टीमच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून सुरक्षित बाहेर काढले. त्यास वनविभागाने माणिकडोह (ता. जुन्नर) येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
बेल्हे येथे कळस रस्त्याच्या कडेला हौदबाग परिसरात हरकचंद बोरा यांच्या शेताजवळील विहिरीत अंदाजे दीड वर्षे वयाचा एक बिबट्या पडल्याचे शनिवारी ४ जून रोजी स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. संबंधितांनी ही माहिती तातडीने वनविभागाला कळवली. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी विहिरीच्या कठड्याभोवती नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
भक्ष्याचा पाठलाग करताना किंवा रस्ता ओलांडताना वाहनाच्या आवाजामुळे घाबरून अंदाज चुकल्याने रात्रीच्या वेळी हा बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट्या विहिरीत पोहून दमल्याने तो विद्युत मोटारीच्या पाइपचा आधार घेण्याचा प्रयत्न करीत होता. ग्रामस्थांनी दोर बांधून चौपाई विहिरीत सोडल्यानंतर तो चौपाईवर विसावला. दरम्यान, वनविभागाने रेस्क्यू टीमच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. त्यास वनविभागाच्या वतीने माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.