पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वसंतदादा साखर इन्स्टिट्युट येथे आयोजित केलेल्या साखर परिषद -२०२२ च्या उद्घाटन उद्धव ठाकरे यांनी केलं. यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही उपस्थिती लावली होती. या वेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कृषि आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थोत कृषी आणि निगडीत क्षेत्राचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे. शेतकरी संपन्न झाल्याशिवाय देशाच्या प्रगतीत अनेक अडचणी आहेत. आकांक्षित जिल्ह्यातही शेतीला समृद्ध केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. यादृष्टीने साखर उद्योग हा कृषि आणि ग्रामीण क्षेत्राच्यादृष्टीने महत्वाचा आहे.

येत्या काळात संशोधनाला खूप महत्व आहे. कृषि क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोगाद्वारे बदल घडवून आणणे गरजेचे आहे. ज्ञानाचे आर्थिक सुबत्तेत परिवर्तन करणे आवश्यक आहे. भविष्यात आपल्या देशात २५  लाख कोटी इंधन आयातीसाठी खर्च करावा लागणार आहे. रस्ते वाहतूकीत वाढ होऊन वाहनांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे इथेनॉल, मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रीक या पर्यायांना खूप वाव आहे.

आपल्या देशात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय झाला आहे. त्यानुसार १ हजार कोटी लिटर इथेनॉल लागणार आहे. तेवढे उत्पादन करण्याची आपल्या साखर कारखान्यांमध्ये क्षमता नाही. येणाऱ्या काळात ऊसाचे दर कमी होणार नाहीत, मात्र साखरेचे दर कमी होऊ शकतील. त्यामुळे येणाऱ्या काळात साखर उद्योग इथेनॉलकडे वळविणे ही काळाची गरज आहे. पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलून यासाठी मार्ग काढावा लागेल.

नव्या तंत्रज्ञानामुळे इथेनॉलचे उपयोगिता मूल्य पेट्रोल एवढेच होणार असल्याने त्यांच्या किंमतीवरही फरक होईल. इथेनॉल हे हरित इंधन आहे, त्यामुळे प्रदूषण कमी होते. पुण्यात इथेनॉलचे  तीन पंप सुरू होऊनही त्यास ग्राहक नाही, मात्र, त्याचा वापर वाढल्यास  शेतकऱ्यांना फायदा होण्यासोबत पुण्यातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. त्यामुळे राज्य शासनाने उपाययोजना कराव्यात.  इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ड्रोनद्वारे फवारणी फायदेशीर आणि अधिक परिणामकारक असल्याने सुशिक्षित युवकांना सहाय्य करून त्यांच्या माध्यमातून  ड्रोनद्वारे खत फवारणीबाबतही शासनाने प्रयत्न करावा. वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटने त्याबाबत मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे वीज देण्याबाबतही शासनाने विचार व्हावा, अशी सूचना गडकरी यांनी केली.  तसेच व्हीएसआयची एक शाखा विदर्भात सुरू करण्याची सूचना मान्य केल्याबद्दल आभार मानले.

मेकॅनायझेशन करा, नाहीतर फिरणं मुश्कील होईल : गडकरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचना करताना नितीन गडकरी म्हणतात, ऊसतोडणीसाठी मेकॅनायझेशनची योजना तयार  करा, नाहीतर फिरणं मुश्कील होईल. राज्याने हे काम करावे, तसेच उसात तेलबिया पिकांचे आंतरपीक घेण्यासाठी पावले उचलावीत. कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन वाढवावे, इथेनॉल वितरणाचा प्रश्न सोडवू, पुढील पाच वर्षे इथेनॉलसाठी चांगली राहतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news