

पिंपरी : पाच हजार रुपये देण्यास नकार दिल्याने मद्यपीने मित्रावर कोयत्याने वार केला. त्यानंतर त्याच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना गुरुवारी 2 जून रोजी सकाळी जुनी सांगवी येथे घडली. लॉरेन्स बाबूराव सांगळे (56, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार,अक्षय उर्फ जोग्या हेमंत जाधव (24, रा. जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघे मित्र आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी ते एकत्र दारू पीत होते. त्यावेळी अक्षय याने फिर्यादी यांच्याकडे पाच हजार रुपये मागितले. त्यावर माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, असे म्हणून फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला.
पैसे नाहीत म्हटल्यानंतर चिडलेल्या आरोपीने त्याच्याकडील पालघनने (लोखंडी कोयता) फिर्यादी यांच्या उजव्या पायावर वार केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, आरोपीने हवेत कोयता फिरवून नागरिकांना तुम्ही मदतीला आला तर सर्वांना जीवे ठार मारीन, अशी धमकी देत दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.