सिंचन विभागात पाण्याचा ठणठणाट; महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष

सिंचन विभागात पाण्याचा ठणठणाट; महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मोठी शहरे आणि लाखो हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करणार्‍या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालय असलेल्या सिंचन भवनातील स्वच्छतागृहांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. कर्मचार्‍यांनी या संदर्भात अभियंत्याकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले. या किरकोळ कामात 'मलिदा' मिळत नसल्याने त्या अभियंत्यांनी ऐकून न ऐकल्यासारखे केल्याचे काही कर्मचार्‍यांनी सांगितले.

विशेषत: महिला कर्मचार्‍यांना याचा त्रास होत असून, अनेकदा बहुतांश कर्मचारी स्वच्छतेसाठी कार्यालयाबाहेर पडत असल्याचे दिसते. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मंगळवार पेठेत असलेल्या सिंचनभवन या कार्यालयात कार्यकारी संचालकांसह मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांची विभागनिहाय कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये तीनशेहून अधिक पुरुष व महिला कर्मचारी आहेत.

कर्मचार्‍यांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली असते. असे असले तरी तिथे फक्त स्वच्छतागृहे आहेत. मात्र, तेथील दुरवस्था न बोललेलीच बरी. सर्वच स्वच्छतागृहात पाण्याअभावी पसरलेली दुर्गंधी आणि त्यातून होणारा त्रास, या विभागातील कर्मचारी सहन करीत आहेत.

महिला कर्मचा-यांनी याबाबत देखभाल दुरुस्ती विभागाच्या अभियंत्याकडे तक्रार करून किमान पाण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. मात्र, या विनंतीला या विभागाच्या अभियंत्यांनी मनमानी करून केराची टोपली दाखविली.

नागरिकांची गैरसोय

सिंचन कार्यालयात कर्मचार्‍यांव्यतिरिक्त बाहेरील जिल्ह्यातून वेगवेगळ्या कामांसाठी हजारो नागरिक येत असतात. मात्र, स्वच्छतागृहात पाणीच नसल्यामुळे त्यांचीही गैरसोय होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी कर्मचार्‍यांनी 'पुढारी'शी बोलताना केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news