

पुणे : पुढारी वृत्तसेवा
राग पोषक आलाप, दाणेदार स्वरांच्या माध्यमातून रसिकांना खिळवून ठेवत बासरीतून ॠतुदर्शन उलगडले. निमित्त होते अमूल्यज्योती संगीत महोत्सवाचे. पं. डॉ. केशव गिंडे यांनी त्यांच्या शिष्यांसह सादर केलेल्या बासरीवादनाला भरभरून प्रतिसाद मिळाला.
पं. पन्नालाल घोष यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिष्यपरंपरेतील पं. डॉ. केशव गिंडे 33 वर्षांहून अधिक काळ 'अमूल्यज्योती'च्या माध्यमातून बासरीवादन, संशोधन, प्रचार, प्रसार, प्रबोधन करीत आहेत.
यानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या महोत्सवाची संकल्पना 'ऋतुदर्शन' ही होती. पं. डॉ. गिंडे यांनी रचलेल्या व बसविलेल्या समूह वेणूवादनात बसंत, बसंत बहार, गारा, सारंग, शुद्ध सारंग, मेघ, मिया मल्हार मालकौंस, जोग, जोगकौंस, भैरव, श्री या बारा रागांतून बसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, या ऋतूंचे दर्शन घडविले.
या कार्यक्रमात बासरीवादनाची साथ नीलेश देशपांडे, सुनील अवचट, दीपक भानुसे, धवल जोशी, आशुतोष जातेगावकर, परंतप मयेकर, सिद्धांत कांबळे या शिष्यांनी केली. त्यांना रामेश्वर घयाळ पखवाज, प्रकाश बेहेरे, कार्तिक स्वामी यांनी साथ केली.
महोत्सवाच्या दुसरे शिष्य तरुण सतारवादक समन्वय सरकार (कोलकाता) यांनी शंकरा रागात आलाप, जोड, झाला व त्रितालातील दोन गती सादर केल्या. शेवटी देसमधील ठुमरीने वादनाची सांगता झाली.
पं. डॉ. अरविंदकुमार आझाद यांनी तबल्यावर हुकमी व समर्पक साथ केली. महोत्सवाच्या मध्यंतरात ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, ज्येष्ठ बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी, संस्कृततज्ज्ञ पं. वसंतराव गाडगीळ, वैज्ञानिक विजय दास यांनी भावना व्यक्त केल्या. महोत्सवानिमित्त पं. डॉ. गिंडे यांच्या वतीने नवोदित बासरीवादक सिद्धांत कांबळे याला मान्यवरांच्या हस्ते अमूल्यज्योती शिष्यवृत्ती देण्यात आली. डॉ. राजीव रानडे यांनी सूत्रसंचालन केले.