

जकार्ता; वृत्तसंस्था : भारतीय संघाने (Asia Cup Hockey 2022) तिसर्या स्थानासाठी झालेल्या लढतीत जपानचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव करत आशिया चषक हॉकी स्पर्धेचे कांस्यपदक पटकावले. सामन्यातील एकमेव गोल भारताच्या राजकुमार पॉलने केला. सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात कोरियाने 4-4 असे रोखल्याने भारताची अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी हुकली. अंतिम सामना द. कोरिया आणि मलेशिया यांच्यात होणार आहे.
तिसर्या स्थानासाठी बुधवारी भारताची (Asia Cup Hockey 2022) गाठ जपानशी पडली. या सामन्यात भारताने पहिल्यापासूनच आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पहिल्या क्वार्टरमध्ये सातव्या मिनिटात राजकुमारने गोल करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जपानने भारतीय क्षेत्रात खोलवर चढाया करून गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, भारतीय खेळाडूंनी जबरदस्त बचाव करत जपानची प्रत्येक चाल धुळीस मिळविली. शेवटी भारताने हा सामना एकमेव गोलने जिंकत कांस्यपदक पटकावले. भारताने यावेळी नवे प्रयोग करताना सीनियर खेळाडूंना विश्रांती देताना नव्या खेळाडूंना संधी दिली. कर्णधारपदाची जबाबदारी वीरेंद्र लाकडावर सोपविण्यात आली होती.
2017 चा भारत विजेता
भारतीय हॉकी संघाने 2017 मध्ये झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यावेळी अंतिम सामन्यात भारताने मलेशियावर 2-1 ने मात केली होती. भारताने आतापर्यंत 2003, 2007, 2017 मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.2013, 2007, 2003, 1994, 1989, 1985, 1982 मध्ये झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.