महाविकास आघाडी झाल्यास राष्ट्रवादीच्या अनेकांच्या उमेदवारीला लागणार ‘ब्रेक’ | पुढारी

महाविकास आघाडी झाल्यास राष्ट्रवादीच्या अनेकांच्या उमेदवारीला लागणार ‘ब्रेक’

मिलिंद कांबळे

पिंपरी : राज्यात यशस्वी झालेली महाविकास आघाडी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे. आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसही सकारात्मक असल्याचे चिन्ह आहे. प्रत्यक्षात आघाडी झाल्यास राष्ट्रवादीच्या काही माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांना यंदाच्या निवडणुकीत ‘ब्रेक’ घ्यावा लागू शकतो.

महापालिकेच्या 46 प्रभागात 139 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्या ओबीसीसह की, ओबीसीशिवाय होणार याबाबत अजूनही एकमत नाही. तसेच, तारखेबाबतही स्पष्टता नसली तरी, केव्हाही निवडणुका लागू शकतात. प्रभागरचनेसाठी ओबीसीशिवाय आरक्षण सोडत सोमवारी 31 मे रोजी काढण्यात आली. आरक्षणासह प्रभागरचना 13 जूनला अंतिम होणार आहे. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘क्लाउड किचन’ला मोठी ‘डिमांड’

अशा स्थितीत आणि राज्यात आघाडीचे सरकार असल्याने पालिका निवडणुकीतही आघाडी होण्याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले व काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम हे स्थानिक पदाधिकारी सकारात्मक आहेत. त्यांना आघाडी होईल, अशी शाश्वती वाटत आहे; मात्र पक्षाचे वरिष्ठ मंडळी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे धोरण राबवावे लागेल, असेही ते सांगत आहेत.

आघाडीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या पूर्वीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखविले आहे. शहरात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. 2017 च्या निवडणुकीत त्यांचे 37 नगरसेवक होते. शिवसेनेचे 9 नगरसेवक पालिकेत होते. तर, काँग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता.आघाडी झाल्यास सध्याचे नगरसेवक व दुसर्‍या क्रमाकांची मते असलेल्या जागेचा आग्रह राष्ट्रवादीकडून सुरु आहे. ती संख्या 100 च्या पुढे आहे. शिवसेना आपल्या 9 जागेवरील हक्क न सोडता, दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या जागाही मागणार आहे.

‘एनी डेस्क’ने कनेक्ट होताय…सावधान! कारण चालू वर्षात झाली 162 जणांची फसवणूक

मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे असल्याने अधिक जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. तर, काँग्रेसकडूनही दोन आकडी संख्येचा आग्रह धरला जात आहे. तसेच, समाजवादी पार्टीलाही काही जागांची अपेक्षा आहे. चर्चेच्या गुर्‍हाळानंतर आघाडी झाल्यास प्राबल्य असलेल्या काही जागा राष्ट्रवादीला मित्र पक्षांना सोडाव्या लागतील. त्यामुळे त्या ठिकाणच्या माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांना यंदा ब्रेक घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे, बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंडखोरी रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागेल. तसेच, आघाडीचा फार्म्युला पिंपरी-चिंचवड शहरात लाभदायक ठरतो का, ते निवडणूक निकालावरून स्पष्ट होईल.

मित्रपक्षासाठी राष्ट्रवादीला माघार घ्यावी लागणार ?

खराळवाडी, गांधीनगर, अजमेरा कॉलनी प्रभाग क्रमांक 18 मध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम व सद्गगुरू कदम हे रिंगणात उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे त्या प्रभागातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना माघार घ्यावी लागेल. शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांना थांबावे लागेल किंवा मयूर कलाटे यांना कुटुंबातील महिला सदस्यासाठी उमेदवारी घ्यावी लागेल. पिंपळे निलख प्रभागात भाजपचा राजीनामा दिलेले व राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले तुषार कामठे यांच्या जागेवरच काँग्रेसचे सचिन साठे यांना दावा केला आहे. या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. शिवसेना व काँग्रेसचे माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक ठिकाणच्या जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे तेथील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांना माघार घेतल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Back to top button