म्हाडा पेपरफुटी प्रकरणात प्रितीश देशमुखला अखेर जामीन मंजूर

म्हाडा पेपरफुटी प्रकरणात प्रितीश देशमुखला अखेर जामीन मंजूर
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या व जीए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख प्रितीश देशमुख याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला व ५० हजारांच्या जातमुचलक्यावर त्याची मुक्तता केली.

सध्याचा राहण्याचा आणि कायमच्या राहण्याचा पत्ता पोलिसांना द्यावा, इमेल आयडी आणि एका नातेवाईकाचे आधार कार्ड दयावे, कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करू नये, तपास अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय भारत सोडू नये, देशमुख याने कायदा व सुव्यवस्था राखावी, यापैकी कोणत्याही अटी शर्तीचा भंग केल्यास जामीन रद्द होण्याची टांगती तलवार असणार आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचा तपास सुरू असतानाच प्रितीश देशमुख याच्याकडून पेन ड्राइव्हसह इतर साहित्य जप्त करण्यात आल्याने म्हाडाचे पेपेरही फुटल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे आरोग्य विभाग आणि टीईटी परीक्षांचे फुटलेले पेपर देशमुख याच्याच कंपनीकडून तयार करण्यात आले होते.

त्याच्यावर परिक्षेबाबत गोपनीयता राखली नाही, प्रश्नपत्रिका हाताळण्यात कुचराई केली, प्रश्नपत्रिका देऊन त्याबदल्यात आरोपी पैसे घेणार होता, कट रचला असे आरोप ठेवण्यात आले होते. आरोपीतर्फे अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद करताना, म्हाडा पेपर फोडण्यासाठी दबाव टाकणाऱ्या लोकांबद्दल आरोपीने संबंधित विभागाकडे तक्रारी अर्ज दिला होता, तसेच पेपर सेट करणे, प्रिंटिंगसाठी पाठवणे ही जबाबदारी आरोपीची असल्यामुळे त्याच्याकडे या सर्व गोष्टी मिळून येणे स्वाभाविक आहे, असे मुद्दे मांडले.

सर्व प्रश्नपत्रिका जी ए सॉफ्टवेअर कंपनीकडे होत्या, आरोपीकडून सध्या कसलीही रिकव्हरी बाकी नाही, म्हाडाचा पेपर फुटल्याची अफवा पसरताच संबंधित यंत्रणेला सर्वात प्रथम आरोपीने कळवले होते, आणि फसवणुकीचा प्रयत्न करणे हा गुन्हा होऊ शकत नाही, असे मुद्देही त्यांनी आपल्या युक्तीवादात मांडले. अॅड. दिग्विजयसिंह ठोंबरे, अॅड. निलेश वाघमोडे यांनी अॅड. विजयसिंह ठोंबर यांना सहाय्य केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news