सांस्कृतिक केंद्रालगतचे गाळे भुईसपाट: बारामतीत पालिकेकडून कारवाई | पुढारी

सांस्कृतिक केंद्रालगतचे गाळे भुईसपाट: बारामतीत पालिकेकडून कारवाई

बारामती : पुढारी वृत्तसेवा

शहरातील सांस्कृतिक केंद्राशेजारील नगरपरिषदेचे शॉपिंग कॉम्प्लेक्स भुईसपाट करण्यात येत आहे. येथे बहुमजली भव्य कॉम्प्लेक्स उभे केले जाणार आहे, परंतु हे करताना पालिकेने तेथील 50 हून अधिक गाळेधारकांचे स्थलांतर केले नाही. परिणामी, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यासंबंधी गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जाधव हे रविवारी (दि. 29) अन्य पदाधिकार्‍यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. त्यांच्याकडून गाळेधारकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली. यासंबंधी गाळेधारक संघटनेने सांगितले की, या ठिकाणी 50 हून अधिक गाळेधारक आपले व्यवसाय करत होते.

कोल्हापूर : शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? खा. राऊतांची फडणवीसांवर टीका

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नगरपरिषदेने येथील शॉपिंग सेंटर पाडण्यास सुरुवात केली आहे. तेथे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. नवीन इमारत उभी करण्यास गाळेधारकांचा कोणताही विरोध नाही, परंतु त्यांचे तात्पुरते स्थलांतर करून उपजीविकेचे साधन सुरू ठेवणे गरजेचे होते. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गाळ्यांवर बुलडोझर फिरवला गेल्याने व्यावसायिकांना रस्त्यावर यावे लागणार आहे.

यासंबंधी पालिका प्रशासनाने गाळेधारकांना विश्वासात घेऊन त्यांची कुठे सोय केली जाणार आहे हे स्पष्ट करावे, तसेच इमारत उभी होण्यापूर्वी गाळेधारकांना हमीपत्र देऊन पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी गाळेधारकांची मागणी असल्याचे जाधव म्हणाले.
सांस्कृतिक केंद्रानजीकचे कॉम्प्लेक्स नगरपरिषदेकडून पाडले जात आहे.

Back to top button