पुणे : पुढारी वृत्तसेवा
सावत्र मुलाला मारहाण केल्याने मध्यस्थी करणार्या पत्नीच्या अंगावर पतीने पेट्रोल ओतून पेटवून दिले. या घटनेत मीनाक्षी सोमनाथ वाघमोडे (वय 40, रा. मंतरवाडी चौक, देवाची उरुळी, हडपसर-सासवड रस्ता) या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोमनाथ लक्ष्मण वाघमोडे (वय 40) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत मीनाक्षी यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) रात्री साडेनऊच्या सुमारास देवाची उरुळी येथील मंतरवाडी चौकातील माई भाडळे यांच्या भाड्याच्या खोलीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी यांचा पहिला विवाह झाला आहे. पतीशी पटत नसल्याने त्यांनी घटस्फोट घेतला.
त्यानंतर सोमनाथशी दुसरा विवाह केला. सोमनाथ ट्रकचालक म्हणून काम करतो. गेल्या पंधरा वर्षांपासून ते एकत्र राहतात. पहिल्या पतीचा मुलगा शेखरला दुचाकी वापरास दिली होती. दुचाकीची चावी परत न केल्याने सोमनाथ त्याच्यावर चिडला होता. सोमनाथने शेखरला घरी बोलावून त्याला चापट मारून मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्या वेळी मीनाक्षीने भांडणात मध्यस्थी केली. तेव्हा सोमनाथने चिडून मीनाक्षीच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल ओतले आणि काडीने पेटवून दिले. या घटनेत मीनाक्षी 40 टक्के भाजल्या असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सोमनाथला अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक हंबीर तपास करीत आहेत.