कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा
संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या साथीमुळे कोपरगावात तिसर्या सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळयात 17 जोडपे विवाहबद्ध झाले. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीदाराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेने 2018 सालापासून हा सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सुरू झाला त्याचे हे तिसरे वर्ष होते.
काल (दि. 27) रोजी तहसिल कार्यालयाच्या मैदानावर झालेल्या विवाह सोहळ्यासाठी सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज, औरंगाबादचे रविंद्र काळे, रामराव देशमुख, राजेंद्र देशमुख, सिध्देश्वर देवस्थान सुरेगांवचे बालब्रम्हचारी महंत गोवर्धनगिरी, कुंभारी येथील राघवेश्वरानंदगिरी महाराज उंडे, महानुभाव आश्रम जेऊरकुंभारीचे डॉ. यशराज महानुभाव, पोहेगावच्या साध्वी शारदानंदगिरी, फादर विशाल त्रिभूवन, बाबा हरजितसिंग, रामेश्वर देवस्थान मळेगांवथडीचे महंत कैलासानंदगिरी महाराज, ओमशांतीच्या सरलादिदी, भंते कश्यप, ओम गुरूदेव आश्रम मायगांवदेवीचे दिनानाथ महाराज शास्त्री, भंते आनंद सुमंतश्री, मधुकर ठाकरे महाराज, मौलाना बशीर रहेमानिया, मौलाना असिफ, बाबूराव महाराज चांदगुडे, मनसुख महाराज दहे, फादर अजय भोसले, कविता साबळे आदि संत महंत आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित होते.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम कोपरगाव बेटचे प्रमुख विश्वस्थ रमेशगिरी महाराज, मंजुर देवस्थानचे शिवानंदगिरी महाराज यांनी चित्रफितीच्या माध्यमातून या सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे कौतुक करून नव वधुवरांना आर्शिवाद दिले. प्रारंभी माजी आमदार स्नेहलता कोल्हे; संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, रेणूका कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, बाळासाहेब संधान, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आदिनी उपस्थितांचे स्वागत केले.
महंत रामगिरी महाराज याप्रसंगी म्हणाले की, माणसाने नेहमीच परोपराची वृत्ती ठेवावी, वडीलधार्यांची सेवा करावी, स्वधर्माचे पालन करावे, परोपकार हेच पुण्य आहे, तीच भगवंताची पूजा आहे. विवेक कोल्हे म्हणाले की, 'जागवूया ज्योत माणूसकीची' या ब्रिद वाक्यातुन आणि माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली त्याला मतदारसंघातील सर्व ज्ञात -अज्ञात सातत्याने पाठबळ देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिक उपस्थित होते.
तीन वर्षांत 84 जोडपी विवाहाच्या बंधनात
विवेक कोल्हे यांच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमांतुन सुरू करण्यात आलेल्या सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळयात सन 2018 मध्ये 26, सन 2019 मध्ये 41 तर सन 2022 मध्ये 17 अशी 84 जोडपी विवाहबद्ध झाली. वर्हाडी मंडळींना अंबा बर्फी, बुंदीसह मिष्टान्न भोजन देण्यात आले.