पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशसेवा ही केवळ सैन्यदलात येऊन करता येते, असे नाही; तर आपण ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रात सक्षमपणे कार्य करीत देशसेवा करू शकतो. त्याकरिता मानसिक दृष्ट्या आपण प्रत्येकाने सक्षम असायला हवे, असे सांगत कारगिल युद्धातील त्याग व शौर्यगाथा तेथे प्रत्यक्ष सहभागी जवान नाईक रमेश पुरी यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडली. युद्धात दिव्यांगत्व पत्करून आजपर्यंत परिस्थितीशी लढा देणार्या रमेश पुरी यांच्या कार्याला 200 विद्यार्थ्यांनी सलाम केला.
सैनिक मित्रपरिवार, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातर्फे कारगिल विजय दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजिला होता. त्यात कारगिल योद्ध्यांचा विशेष सन्मान व कारगिल रणसंग्रामाचा पोवाडा सादरीकरण हे कार्यक्रम झाले. या वेळी ब्रिगेडिअर प्रसाद जोशी (निवृत्त), बंडोपंत कुलकर्णी, संस्थेचे शाला समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे, वासंती बनकर, आनंद सराफ आदी उपस्थित होते. रमेश पुरी यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर हेमंत मावळे आणि सहकार्यांनी कारगिल रणसंग्रामाचा पोवाडा सादर करून केली. प्रशालेतील विद्यार्थिनींनी रमेश पुरी यांचे
औक्षण केले.
त्यागाची आठवण ठेवायला हवी
रमेश पुरी म्हणाले, मी मूळचा उत्तराखंड येथील असून, गेली 19 वर्षे महाराष्ट्रात राहत आहे. महाराष्ट्राने माझी सर्वतोपरी काळजी घेतली आहे. सन 1991 मध्ये मी सैन्यदलात भरती झालो. सलग 8-9 वर्षे काश्मीर परिसरात काम केले. त्यानंतर 1999 मध्ये द्रास सेक्टरमध्ये कारगिल युद्धावेळी मी होतो. तेव्हा भारतीय जवानांनी पराक्रमाने शत्रूचा नाश केला. त्यामध्ये अनेक जवान जखमी झाले, तर अनेकांनी प्राणांची आहुतीदेखील दिली. याची आठवण आपण ठेवायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :