दोनशे मुलींची शाळा सुटली! जिल्हा परिषदेच्या शाळाबाह्य सर्वेक्षणातील धक्कादायक माहिती

दोनशे मुलींची शाळा सुटली! जिल्हा परिषदेच्या शाळाबाह्य सर्वेक्षणातील धक्कादायक माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'पालकांच्या मोलमजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागतो. आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षणाचा खर्च भागवणे अवघड होते. त्यातच मी खूप दिवस झाले शाळेतच गेलेले नाही अन् आता शाळेत जाण्याची गोडीही राहिली नाही. पालकांनीही शाळेत जायला नकार दिलाय…'

2019 पासून उरुळी कांचनमधील शाळेतून बाहेर पडलेली अलका (नाव बदलले आहे) सांगत होती. 11 ते 14 वयोगटातील पुण्यातील अशा 190 मुलींनी मागील काही वर्षांत शाळेचा उंबरा ओलांडलेला नाही. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून फेब्रुवारी महिन्यात शाळाबाह्य मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल तयार झाल्यानंतर शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यातील या 190 मुली असून त्यापैकी 55 मुली शहरातील, तर 135 मुली ग्रामीण भागातील आहेत. कोरोनाच्या काळानंतर शिक्षणापासून मुले लांब जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्याच पद्धतीचे उत्तर सर्वेक्षणात अलकाकडून मिळाले. अनेक दिवस घरी राहिल्याने तिला शाळेची गोडी कमी झाल्याचे समोर आले. परंतु अलकासारख्या इतर सर्वच मुलींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यात त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल.

प्रत्येक मुलीच्या घरापर्यंत पोहोचून महिला बालकल्याण विभागाकडून तिला पुन्हा शाळेत आणण्यासाठी सध्या ही मोहीम सुरू असून, त्याद्वारे मुलीसह त्यांच्या पालकांशीदेखील संवाद साधण्यात येत आहे. गरजू मुलीला आवश्यक असलेली प्रत्येक बाब मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे. त्यासाठी काही ठिकाणी सीएसआरचीदेखील मदत होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

ही आहेत शाळा सुटण्याची मुख्य कारणे…

  1. श्रमशाळा बंद केल्याने शाळेत जाणे बंद झाले
  2. उदरनिर्वाहासाठी आम्हाला राहते ठिकाण सतत बदलावे लागते
  3. लहान भावंडे सांभाळण्यासाठी घरी थांबावे लागते
  4. आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही
  5. दहावीमधून शाळा सोडावी लागली, कारण पुढच्या शिक्षणासाठी लांब जावे लागते

सर्वेक्षणात आढळलेल्या शाळाबाह्य मुलींना आम्ही पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहोत. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मोहीम हाती घेतली असून, प्रत्येक मुलीच्या घरापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना हवी ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. उदा. एखाद्या मुलीला सायकल हवी असल्यास ती देण्याचा प्रयत्न केला जाईल.
जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news