दरड कोसळणार्‍या या 23 गावांची निधीसाठी ‘वणवण’

दरड कोसळणार्‍या या 23 गावांची निधीसाठी ‘वणवण’

दिगंबर दराडे

पुणे : जिल्ह्यातील पूरग्रस्त तेवीस गावांना निधीसाठी वणवण करावी लागत आहे. या गावांमध्ये ठोस काम होत नसल्याने नियोजनात आघाडी आणि अंमलबजावणीत पिछाडी असल्याचे वास्तव समोर आले आहे. भोर तालुक्यातील कोंढरे गावात तेरा कोटींची कामे होणे आवश्यक आहे, तर धानवली गावात 35 कोटी रुपयांची कामे करणे आवश्यक आहे. मुळशी तालुक्यातील गुहटेकमध्ये 8.80 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

धानवली या गावातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. मात्र, अन्य कामांसाठी निधीची अजून आवश्यकता आहे. मावळ तालुक्यातील ताजे लोहगड, बोरज तुंग, माळवाडी या पाच गावांतील कामे पूर्णत्वाला आलेली आहेत. पंधरा गावांतील पुनर्वसनासाठी निधीची आवश्यकता लागणार आहे. 65 कोटीची मागणी करूनही निधी मिळालेला नाही. माळीण दुर्घटनेनंतर अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्राथमिक पाहणीत अशी 95 ठिकाणे धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

या ठिकाणची पाहणी भूजल आणि सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत केली. 23 गावांमध्ये दरडीचा धोका असल्याचे समोर आले आहे. या गावांमध्ये विविध उपाययोजना करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड केली. त्यांनी सुचविलेल्या शिफारशींनुसार या गावांतील कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.मात्र या गावांत आणखी कामे रखडलेले वास्तव समोर आलेले आहे.

फुलवडेअंतर्गत भगतवाडी, माळीणअंतर्गत परसवाडी, आसाणे, जांभोरीअंतर्गत काळेवाडी-बेंडारवाडी ही सर्व आंबेगाव तालुक्यातील गावे, तर लोहगड, ताजे, बोरज, तुंग, भैरवनाथ मंदिर परिसर माळवाडी, माऊ गबाळेवस्ती, माऊ मोरमाचीवाडी, भुशी (सर्व मावळ), मोरगिरी, पदरवस्ती, भोमाळे, खेड-जांभुळवाडी आदी गावांचा समोवश आहे. पांगारी, सोनारवाडी, डेहेणे, धानवली खालची (सर्व भेार), घुटके (मुळशी), आंबवणे, घोल (वेल्हा) निमगिरीअंतर्गत तळमाची (जुन्नर) येथील ही गावे आहेत.

दरड कोसळणार्‍या गावांतील काम मार्गी लावण्यासाठी तब्बल 65 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच लवकरात लवकर या ठिकाणची कामे मार्गी लावण्यात येतील.
                                                 – विठ्ठल बनोटे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news