मार्केट यार्डला पर्याय साष्टेचा; बाजारांच्या स्थलांतरासाठी ‘यशवंत’ची 125 एकर जागा उपलब्ध | पुढारी

मार्केट यार्डला पर्याय साष्टेचा; बाजारांच्या स्थलांतरासाठी ‘यशवंत’ची 125 एकर जागा उपलब्ध

सुनील जगताप

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणार्‍या मालाची वाढलेली व्याप्ती, तर दुसर्‍या बाजूला भविष्यात होणार्‍या रिंगरोडमुळे मालवाहतूकदारांची अडचण होणार आहे. त्यामुळे बाजार समितीच आता पर्यायी जागेचा शोध घेत असून, साष्टे गावातील एका जागेवर शिक्कामोर्तब झाल्याचे बाजार समितीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड येथील बाजाराचे स्थलांतर झाले, तरी मूळ बाजार मात्र सुरूच राहणार आहे.

या ठिकाणी अडत्यांचे कार्यालय त्यांच्या गाळ्यांमध्ये सुरू राहणार असून, मालाची साठवणूक करण्यासाठी पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरू आहे.रिंगरोडच्या पार्श्वभूमीवर मालवाहतूक करणार्‍या मोठ्या वाहनांना शहरात येणे अशक्य असल्याने त्यांच्यासाठी पर्यायी जागेचा शोध बाजार समिती घेत आहे. बाजार समितीच्या वतीने साष्टे गावातील 53 एकर जागेवर पीएमआरडीएकडून आरक्षण टाकून घेण्यात आले आहे.

त्या ठिकाणी फळ, तरकारी आणि फुलमार्केट हलविण्याचा विचार सुरू आहे, तर यशवंत साखर कारखान्याच्या 125 एकर जागेची मागणी करणारा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे. त्याचबरोबर आणखी काही ठिकाणी शासनाकडून जागा घेण्याबाबतच्या हालचाली सुरू असून, एकूण 250 ते 300 एकर जागा बाजारासाठी लागणार असल्याचे समितीचे प्रशासक
मधुकांत गरड यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले

दिवे गावातील जागा निसटली

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पीएमआरडीएकडून हवेली तालुक्यातील साष्टे या गावात 53 एकरांसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. तसेच थेऊर येथील यशवंत साखर कारखान्याची 125 एकर जागेची मागणीही करण्यात आली आहे. परंतु, प्रस्ताव रखडलेला असून, अजून काही ठिकाणी वेगवेगळ्या जागांची पाहणी सुरू आहे.

                                    – मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Back to top button