पिंपळे सौदागरमध्ये क्रिकेट बेटिंगच्या अड्ड्यावर छापा; साडेपाच लाखांचे साहित्य जप्त | पुढारी

पिंपळे सौदागरमध्ये क्रिकेट बेटिंगच्या अड्ड्यावर छापा; साडेपाच लाखांचे साहित्य जप्त

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या क्रिकेटच्या बेटिंगच्या अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून बेटिंगसाठी लागणारे पाच लाख 31 हजार 390 रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. शनिवारी (दि. 21) रात्री साडेनऊच्या सुमारास मालपाणी इस्टेट, पिंपळे सौदागर येथे ही कारवाई करण्यात आली.

विनोद ऊर्फ बाळू बळीराम अग्रवाल (वय 44), शुभम अजय जागीरदार (वय 28), रोहित उर्फ सोनू कैलास अग्रवाल (वय 21, तिघे रा. मालपाणी इस्टेट, पिंपळे सौदागर), सनी जगदीश मंगलानी (वय 32 रा. पिंपरी), हितेश पुरण लोहाना (वय 30, रा. कापसे हाइट्स, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आपसात संगनमत करून मालपाणी इस्टेट सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये क्रिकेट बेटिंग अड्डा चालवत होते. याबाबत गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला माहीती मिळाली.

त्यानुसार, पथकाने छापा मारून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे 30 मोबाईल, तीन लॅपटॉप, एक पैसे मोजण्याची मशीन, हिशोबाच्या डायर्‍या, असा एकूण पाच लाख 31 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास सहायक निरीक्षक तानाजी भोगम करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिन्द्र पंडित, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलिस कर्मचारी प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, तुषार काळे,सुनील गुट्टे, नीलम शिवतरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम खरेदी

आरोपींकडून पोलिसांनी तीस सिम कार्ड असलेले मोबाईल जप्त केले आहेत. बेटिंगसाठी वापरलेल्या मोबाईल क्रमांकाची पोलिसांनी माहिती घेतली असता सिम कार्ड खरेदीसाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केल्याचे समोर आले.

हेही वाचा :

 

Back to top button