सर्व्हर डाऊनमुळे मिळकतधारक ताटकळले; धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार | पुढारी

सर्व्हर डाऊनमुळे मिळकतधारक ताटकळले; धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कार्यालयात मिळकतकर भरण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा, माझा नंबर कधी येईल, घराचा करभरणा करण्यासाठी कोणत्या रांगेला थांबू, अशी विचारणा करणारे ज्येष्ठ नागरिक; सर्व्हर डाऊन आहे, थोड्या वेळाने या, असे सांगणारे लिपीक… हे चित्र होते धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त कार्यालयासमोरचे. सोमवारी (दि. 23) महानगरपालिकेच्या मिळकतकर भरणा संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन होते.

त्यामुळे धनकवडी येथील मनपाच्या कै. ह. भ. प. माधवराव शंकरराव कदम भवनातील सहायक आयुक्त कार्यालयात कर भरणा करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. मिळकतकर भरणा वेळेत होण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच हजेरी लावलेली होती. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांना अक्षरश: ताटकळत राहावे लागले. त्यात तरुणांसह बहुतांश ज्येष्ठ नागरिक होते. विजेच्या ‘ये-जा’बरोबर सर्व्हर अप-डाऊन होत राहिल्याने नागरिकांचे अक्षरश: हाल होत होते.

मात्र, त्याकडे ना तेथील अधिकारी लक्ष देत होते, ना कर्मचारी. अगदीच एखादा नागरिक कधी सुरू होणार, अशी विचारणा करायला गेल्यावर, ‘आम्ही सावरकर भवन येथील कार्यालयास पत्र लिहिले आहे, वीज गेली की सर्व्हर सतत डाऊन होतो. पंधरा मिनिटांत सुरू होतो किंवा अर्धा तासही लागतो,’ अशी उत्तरे येत होती. साहजिकच, वैतागलेले एकेक करून घरी निघून जात होते. ’तुम्ही पगार घेताय ना? मग तुमची काही जबाबदारी नाही का?

तुमच्या सर्व्हर डाऊनमुळे रांगेतील लोक एक-एक निघून जायला लागले आहेत. एक दिवस उशिरा मिळकतकर भरला की तुम्ही दंड आकारता, सवलतीही काढून घेतल्या जातात. कर वेळेत भरणा व्हावा, यासाठी सकाळपासून रांगेत लागलेल्या करधारकांप्रती प्रशासनाची काहीच जबाबदारी नाही का, असा संतप्त सवालही नागरिक व्यक्त करीत होते.

यमाईदेवी तळे सुशोभीकरणासाठी 39.58 कोटींच्या प्रस्तावास मान्यता

कर भरणा, जन्म-मृत्यू दाखल्याचेही काम एकाच विभागाकडे

ज्या टेबलावर धनादेश घेतले जातात, त्याच ठिकाणी जन्म-मृत्यू दाखल्याचेही काम असल्याने संबंधितांवर अतिरिक्त ताण आल्याने एकच गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले. त्यावर मनपाच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त तळमजल्यावर येऊन कधी लक्ष देणार? हा खरा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

रांगेत तासाभराहून अधिक वेळापासून मी थांबलेलो आहे. सकाळपासून महापालिकेचा सर्व्हर तीन वेळा डाऊन झाला आहे. वीज ये-जा करतेय, त्याचबरोबर सर्व्हरही चालू-बंद होत आहे. त्यामुळे कर भरणा होईना आणि रांग पुढे सरकेना, अशी स्थिती आहे. तरीही कोणीच अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

– एक स्थानिक नागरिक

Back to top button