यमाईदेवी तळे सुशोभीकरणासाठी 39.58 कोटींच्या प्रस्तावास मान्यता | पुढारी

यमाईदेवी तळे सुशोभीकरणासाठी 39.58 कोटींच्या प्रस्तावास मान्यता

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील औंध येथे यमाईदेवी तळे सुशोभीकरण आणि परिसर विकासाच्या कामास सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून हे काम करण्यात येणार आहे. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते.

औंध (ता. खटाव) येथील यमाई देवी तळ्याची सुधारणा करून परिसर विकसित करण्याबाबतचा 39.58 कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी पर्यटन विभागाकडे सादर केला होता. या विषयावर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रारंभी प्रस्तावाचे सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी या निधीतून कोणकोणती कामे केली जाणार याची माहिती उपस्थित मंत्र्यांना दिली. त्याचबरोबर यमाई देवी तळे औंध ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. मंदिर परिसरात सांस्कृतिक वैभव असून 400 वर्षांचा इतिहास आहे.

परिसर विकासाची कामे करण्यास संबंधित

ग्रामपंचायतीची हरकत नसून काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायत याची देखभाल दुरूस्ती करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यानंतर सविस्तर चर्चा केल्यानंतर या विकासकामांच्या निधीसाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळे औंध परिसराचा कायापालट होण्यास मदत मिळणार आहे.

Back to top button