शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा : शरद पवार | पुढारी

शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा : शरद पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा ; राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना जो उमेदवार देईल त्यालाच राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल, असे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याचे सुतोवाच शरद पवार यांनी यापूर्वी केले होते. मात्र, राष्ट्रवादीने आता भूमिका बदलल्याचे पवार यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट झाले.

राज्यसभा उमेदवारीसंदर्भात पवार म्हणाले, राष्ट्रवादीचा एक उमेदवार आमच्या मतांवर निवडून येतो. त्यानंतर काही मते शिल्लक राहतात. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली तेव्हा आम्हाला दोन जागा हव्यात, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली. त्यांनी त्या वेळी शिवसेनेची जादा मते दिल्याने मी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार फौजिया खान राज्यसभेवर निवडून गेलो. त्याचवेळी पुढील निवडणुकीत आमची जादा मते शिवसेनेला देण्याचा शब्द आम्ही दिला होता. त्यामुळे आता शिवसेनेतर्फे संभाजीराजे असोत अथवा अन्य कोणी उमेदवार आमची मते शिवसेनेच्या उमेदवाराला जातील.

Back to top button