गोठ्याशेजारी खेळत असलेला वरद अचानक गायब झाला; तेवढ्यात ऊसातून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आणि….

गोठ्याशेजारी खेळत असलेला वरद अचानक गायब झाला; तेवढ्यात ऊसातून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आणि….

पुढारी वृत्तसेवा: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात वरद नितीन शिवले हा तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. शुक्रवार २० मे रोजी रात्री ८.३० च्या सुमारास वरद नितीन शिवले हा वढू बुद्रुक येथील गावखरी मळा येथे गोठ्याशेजारी खेळत होता. वरद अचानक दिसेनासा झाल्याने आरडाओरडा झाल्याचे पाहत संतोष शिवले व अर्जुन शिवले यांनी आजूबाजूच्या परिसरात शोधण्यास सुरुवात केली. इतक्यात शेजारील उसाच्या बाजूने बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आल्याने सदर ठिकाणी संतोष शिवले व ग्रामस्थांनी धाव घेतली.

ग्रामस्थांच्या आवाजामुळे बिबट्याने भीतीने तेथून पळ काढला. वरद शिवले जखमी अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले. त्यास उपचारासाठी वाघोली येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये भरती केले. वरदची अवस्था पाहत त्याला लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये फक्त प्रथमोपचार देवून पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्वरित पाठवण्यात आले.

यापुर्वीही वढू बुद्रुक,वाजेवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरात ही बिबट्यांने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. तसेच ठिकठिकाणी बिबट्यांचे पिल्ले आढळून येत आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. शेतातील कामासाठी एकट्याने जाणे टाळले जात आहे. वनविभागाने लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. सदर घटना समजताच वनविभागाने शनिवार २१ मे रोजी सकाळीच वढू बुद्रुक येथे पिंजरा लावून बिबट्याला आळा घालण्याचे प्रेयत्न सुरू केले असल्याचे माजी सरपंच अंकुश शिवले यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news