तुम्हाला 360 रुपयांची सिमेंटची गोणी 260 रुपयांना मिळेल म्हणत वकिलाला साडेसहा लाखांना गंडा | पुढारी

तुम्हाला 360 रुपयांची सिमेंटची गोणी 260 रुपयांना मिळेल म्हणत वकिलाला साडेसहा लाखांना गंडा

नगर : पुढारी वृत्तसेवा

स्वस्तात सिमेंट देतो असे सांगून अंबुजा सिमेंट कंपनीच्या नावाखाली एका ठगाने ऑनलाईन पद्धतीने शहरातील वकिलाला साडेसहा लाखांना गंडा घातला. ही घटना 13 ते 17 मे दरम्यान घडली. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अ‍ॅड. हरिष शरद भांबरे (रा. आनंद कॉम्प्लेक्स, सारसनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. अ‍ॅड. हरिष भांबरे यांच्या बंगल्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सिमेंटची आवश्यकता होती. स्थानिक ठिकाणी चौकशी केली असता सिमेंटचे दर जास्त दिसले. त्यामुळे त्यांनी अंबुजा सिमेंट कंपनीची वेबसाईट तपासली. त्या वेबसाईटला संपूर्ण माहिती भरली आणि सिमेंटची आवश्यकता असल्याचे कळविले. त्यानंतर 13 मे रोजी त्यांना गौतम कृष्णा याचा मोबाईलवर फोन आला.

मुख्यमंत्री सडक योजनेला ‘नियोजन’चा हात; 646 किलो मीटर रस्त्यांसाठी 129 कोटी रुपये वर्ग होणार

अंबुजा सिमेंट कंपनीतून बोलत आहे. तुम्हाला सिमेंटच्या गोण्या हव्या आहेत का? भांबरे त्याला होय म्हणाले. तुम्हाला 360 रुपयांची गोणी 260 रुपयांना मिळले, असे सांगितले. त्यानंतर संबंधिताने भांबरे यांच्या मोबाईल क्रमांकावर संपूर्ण माहिती व कागदपत्रे पाठविली. त्यामुळे भांबरे यांचा विश्वास बसला. साधारण दीड हजार गोण्या घेतल्या तर त्या 3 लाख 96 हजारांना मिळतील असे सांगितले. ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठविल्यानंतर दोन दिवसांत गोण्या पोहोच होतील. अ‍ॅड. भांबरे यांनी ऑनलाईन पद्धतीने संबंधिताच्या बँक खात्यावर पैसे पाठविले. त्यानंतर दोन दिवसांत गोण्या आल्या नाही म्हणून भांबरे यांनी पुन्हा फोन करून चौकशी केली. त्यावेळी गौतम कृष्णा नावाच्या व्यक्तीने सांगितले की, तुम्हाला आमच्याकडून अर्धवट माहिती मिळाली आहे. आम्ही 2 हजार 500 गोण्या देतो दीड हजार नाही. तुम्हाला हव्या असतील तर सांगा नाहीतर पैसे पुन्हा पाठवतो. त्यात अ‍ॅड. भांबरे यांनी पुन्हा 2 लाख 60 हजार रुपये संबंधिताच्या खात्यावर पाठवून 2 हजार 500 गोण्या मागविल्या. दोन दिवस सिमेंट येण्याची वाट पाहिली.

‘आरोग्य’च्या साडेपाचशे जागा भरणार! शासन आदेशाने हालचाली; झेडपीलाच भरतीचे अधिकार

फोन करून विचारणा केली असता तो आज, उद्या पोहोच होतील, असे सांगत होता. अ‍ॅड. भांबरे यांनी पुन्हा इतरत्र चौकशी केली असता अशा पद्धतीने सिमेंटच्या गोण्या मिळत नसतात असे समजले. त्यानंतर अ‍ॅड. भांबरे यांनी संबंधित बँकेत जाऊन चौकशी केली असता ते खाते अंबुजा सिमेंट कंपनीचे नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. याप्रकरणामध्ये अ‍ॅड. भांबरे यांची 6 लाख 62 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Back to top button