Jofra Archer Injury : निर्णायक कसोटीपूर्वी इंग्लंडला धक्का | पुढारी

Jofra Archer Injury : निर्णायक कसोटीपूर्वी इंग्लंडला धक्का

लंडन ; वृत्तसंस्था : इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer Injury) याने यंदाच्या समर सिजनमधून माघार घेतली आहे. त्याच्या पाठीला फ्रॅक्चर असल्याचे समोर आले आहे आणि त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसह भारताविरुद्धच्या वन-डे, टी-20 मालिकांसह निर्णायक कसोटीतही खेळणार नाही. त्यामुळे इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. याशिवाय जोफ्रा कधी मैदानावर परतेल, याबाबत अनिश्चितता असल्याने आयपीएल फ्रँचाईजी मुंबई इंडियन्सही चिंतीत आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2022 नंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका आटोपून आयर्लंड व इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. आफ्रिका व आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआय आपला दुय्यम संघ पाठवण्याची शक्यता आहे. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंड दौर्‍यावर खेळणार आहेत.

भारतीय संघ 16 जूनला इंग्लंड दौर्‍यासाठी रवाना होणार आहे आणि 1 ते 5 जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड पाचवी कसोटी होणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे इंग्लंड दौर्‍यावरील पाचवी कसोटी स्थगित करण्यात आली होती आणि ती कसोटी यंदा होणार आहे. भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असल्याने इंग्लंडसाठी ही कसोटी निर्णायक आहे. अशात त्यांना एक मोठा धक्का बसला आहे.

जोफ्रा आर्चर (Jofra Archer Injury) कधी मैदानावर परतेल, याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कोणताही कालावधी सांगितलेला नाही. त्यांनी दिलेल्या माहितीत ‘नो टाईम फ्रेम’ असे म्हटले गेले आहे. त्यामुळे जोफ्रा पुढील वर्षी होणार्‍या इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळेल की नाही, अशी चिंता चाहत्यांना सतावत आहे. जोफ्राला 8 कोटींत मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले आहे. यंदाच्या पर्वात दुखापतीमुळे त्याला सहभाग घेता आला नाही.

इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा 2019 च्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेनंतर अ‍ॅशेस मालिकेतील दोन कसोटी खेळला, त्यानंतर तो दुखापतीमुळे बाहेरच आहे. डिसेंबर महिन्यात त्याच्या कोपरावर दुसर्‍यांदा शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळता आले नाही. त्यानंतर पुन्हा पाठीच्या दुखापतीमुळे त्याने ऑगस्ट महिन्यात अ‍ॅशेस मालिकेतून माघार घेतली.

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

पाचवी कसोटी – 1 ते 5 जुलै 2022, एडबस्टन

टी-20 मालिका

पहिला सामना – 7 जुलै 2022, एजीस बॉल
दुसरा सामना – 9 जुलै 2022, एडबस्टन
तिसरा सामना – 10 जुलै 2022, ट्रेंट ब्रिज

वन डे मालिका

पहिला सामना – 12 जुलै 2022, ओव्हल
दुसरा सामना – 14 जुलै 2022, लॉर्ड्स
तिसरा सामना – 17 जुलै 2022- ओल्ड ट्रॅफर्ड

Back to top button