दिवाळीत मेट्रोची धाव जाणार बंडगार्डनपर्यंत | पुढारी

दिवाळीत मेट्रोची धाव जाणार बंडगार्डनपर्यंत

ज्ञानेश्वर बिजले

न्यायालय ते रामवाडी मार्गावरील मेट्रो दिवाळीच्या आसपास किमान चार स्थानकांवर धावणार आहे. तोपर्यंत कोथरूडची मेट्रो न्यायालयापर्यंत पोहोचल्यास, ती पुढे थेट बंडगार्डनपर्यंतही धावण्याची शक्यता आहे.

महामेट्रोने 2017 मध्ये पुण्यातील मेट्रोचे काम सुरू केले. मात्र, वनाज ते रामवाडी या दुसर्‍या मार्गावरील न्यायालय ते रामवाडी या 8.3 किलोमीटरच्या टप्प्याचे काम उशिरा म्हणजे ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू झाले. शहरातील अन्य मेट्रोमार्गाच्या तुलनेत ‘रिच तीन’ म्हणजे न्यायालय ते रामवाडी येथे काम करणे अवघड होते.

Jasprit Bumrah : बुमराहने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करत बनला पहिला भारतीय गोलंदाज!

अरुंद रस्त्यांवरील वाहतुकीच्या गर्दीमुळे खोदण्याचे काम कमी जागेत व दिवसाच करावे लागले. न्यायालयापासून रेल्वे स्थानकाकडे, तसेच बंडगार्डनकडून येरवड्याकडे जाताना दोन ठिकाणी नदीवर मोठे पूल बांधले. एकदा लोहमार्ग ओलांडत, तर दोन ठिकाणी नदीवरील पुलावरून मेट्रो धावणार आहे.

‘रिच तीन’वरील मेट्रोचे काम उशिरा सुरू झाले, त्यातच आगाखान पॅलेससमोरून मेट्रो नेता येणार नसल्याचा निर्णय झाला. त्यामुळे नियोजित मार्ग बदलावा लागला. मेट्रोला येरवड्यातून गुंजन टॉकीज चौकानंतर वळून कल्याणीनगरमार्गे जावे लागले. तेथून पुन्हा नगर रस्त्यावर येऊन रामवाडीला जावे लागले. यामुळे मार्ग नऊशे मीटरने वाढला. काही ठिकाणी भूसंपादनाला झालेल्या विरोधामुळे जागा उशिरा ताब्यात आली.

सोमय्यांकडून राऊतांवर मानहानीचा खटला दाखल

कोरोना साथीच्या काळात कामगार घरी गेल्याने काम रखडले होते. कामगार परतल्यावर ‘रिच तीन’मधील मेट्रोच्या कामाने वेग घेतला. या भागातील मेट्रो स्थानकांची कामेही अन्य भागाच्या तुलनेत अधिक झाली आहेत.

न्यायालयानंतर मंगळवार पेठ (आरटीओजवळ), पुणे रेल्वेस्थानक, रुबी हॉल क्लिनिक आणि बंडगार्डन या चार स्थानकांवर येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान मेट्रो सुरू करणार आहोत. या मेट्रो स्थानकांची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. ‘रिच तीन’ म्हणजे न्यायालय ते रामवाडी या मार्गावरील कामे अपेक्षेपेक्षा वेगाने पार पडली.
– अतुल गाडगीळ,
संचालक, महामेट्रो

(क्रमश:)

 

Back to top button