दसर्‍यानंतर मतदारांची ‘दिवाळी’ | पुढारी

दसर्‍यानंतर मतदारांची ‘दिवाळी’

पुणे : पुढारी वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता मुंबईप्रमाणेच पुणे महापालिकेची निवडणूकही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मतदारांची यंदाची दसरा-दिवाळी जोरात साजरी होणार असून इच्छुकांवर ‘होऊ दे खर्च’ म्हणण्याची वेळ येणार आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने ज्याठिकाणी पाऊस नसतो, त्याठिकाणी निवडणुका आत्ता घ्याव्यात.  तसेच मुंबई कोकणसह ज्याठिकाणी पाऊस असतो, अशा निवडणुका पावसाळ्यानंतर घ्याव्यात, असे निर्देश दिले असून त्यासंबंधीचे अधिकारही आयोगाला दिले आहेत.
त्यामुळे मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड पालिकांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाले. प्रामुख्याने ऑक्टोबरमध्ये दसरा आणि दिवाळी हे दोन्ही मोठी सण येत आहे. या कालावधीत निवडणुका झाल्यास उमेदवारांना मतदारांवर भेटवस्तूंची लयलूट करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.
त्यातच गणेशोत्सवासह आणखीही काही सण-उत्सव मध्यंतरीच्या कालावधीत होणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुका होईपर्यंत कराव्या लागणार्‍या  खर्चाने इच्छुक उमेदवारांच्या खर्चाचे गणित कोलमडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button