नेवासा : पुढारी वृत्तसेवा
कांद्याचे भावच वाढत नसल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आलेल्या कांद्याच्या पिकात नफा नाही, निदान उत्पादन खर्चही निघतोय की नाही, या धास्तीने नेवासा तालुक्यातील शेतकरी वर्ग धास्तावला आहे. उन्हाळी कांदा काढणी जवळपास झालेली असून, भाववाढीची शक्यता सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे शेतकर्यांकडून आता काढलेला कांदा भुसार्यात व चाळीमध्ये साठवूण ठेवला जात आहे. त्यामुळे भुसारे, चाळी कांद्याने फुल्ल झाल्या आहेत.
नेवासा तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झालेली आहे.कांदा लागवडी उशिरापर्यंत सुरू होत्या. उसाबरोबरच कांद्याचीही लागवड झालेली आहे. छोट्या-मोठ्या शेतकर्यांनीही कमीत कमी अर्धा एकर कांदा केलेला आहे. कांद्यामध्ये लॉटरी लागेल, अशीच सर्वांना आशा असतानाच, सध्या कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकर्यांच्या डोक्यावरही चिंतेचे ढग जमा झाले आहेत. लोकांची उधारी, उसनवारी कशी द्यावी, हाच प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे.
उत्पन्नात झाली निम्म्याने घटसध्या उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. मात्र, भरमसाठ खर्च करूनही अपेक्षित उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. बाजार भावांचा दणका बसल्याने व हवे तसे उत्पन्न नसल्याने शेतकर्यांचा खर्च देखील निघणार नाही. भाव वाढीचे संकेत मिळत नसल्याने यंदा कांदा शेतकर्यांचा वांधा करण्याची शक्यता आहे.प्रारंभी कांद्याला बाराशे ते चौदाशे रुपये भाव जागेवरच मिळाला. यंदा कांद्याला भाव येईल, अशीच अपेक्षा होती. पंधराशेच्यापुढे कांदा गेला तर थोडा फार फरक पडतो. परंतु, दोन महिन्यांपासून कांद्याच्या भाववाढीच्या हालचालीच दिसत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.संजय जाधव,शेतकरी, चिंचबन