

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने तब्बल 19 अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन किंवा मुक्त व दुरस्थ पध्दतीने प्रवेशास मनाई केली आहे. त्याचबरोबर यासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमांना मान्यता आहे किंवा नाही, याची खातरजमा करूनच पुढील प्रक्रिया करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यूजीसीकडून देशभरातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाइन माध्यमासह मुक्त व दुरस्थ पध्दतीने विविध अभ्यासक्रमांना परवानगी दिली जाते. पण अनेक संस्थांना मान्यता नसताना त्यांच्याकडून असे अभ्यासक्रम चालविले जातात.
विद्यार्थ्यांकडून कसलीही खातरजमा न करता अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला जातो. त्यामुळे त्यांची फसवणूक होते. अशा तक्रारी सातत्याने येत असतात. या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक प्रवेश घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
यूजीसीने दिलेल्या सूचनांनुसार, उच्च शिक्षण संस्थांना मुक्त व दुरस्थ अभ्यासक्रम व ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी मान्यता आहे का, हे विद्यार्थ्यांनी तपासावे. यूजीसीसह संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर त्याची माहिती पाहावी. याबाबतची माहिती यूजीसीच्या http:/dep.ugc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांचीही माहितीही या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नरसी मोनजी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेमध्ये जुलै-ऑगस्ट 2023 आणि जानेवारी-फेब्रुवारी 2024 या शैक्षणिक सत्रांसाठी मुक्त व दुरस्थ तसेच ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशास मान्यता दिलेली नाही. तसेच आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वरा विद्यापीठ व तमिळनाडूतील पेरीयार विद्यापीठामध्ये प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, 30 सप्टेंबरच्या आतमध्येच दुरस्थ व ऑनलाइन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण
करण्याचे निर्देश यूजीसीच्या वतीने देण्यात आले आहेत.
अभियांत्रिकी, वैद्यकीय, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि इतर पॅरा मेडिकल अभ्यासक्रम, औषध निर्माणशास्त्र, नर्सिंग, दंतवैद्यक, वास्तुकला, विधी, कृषी, उद्यानविद्या, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, कलिनरी सायन्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स, व्हिज्युअल आर्ट्स अॅन्ड स्पोर्ट्स, अॅव्हिएशन. योगा अॅण्ड टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त पीएच.डी. व एम.फील हे अभ्यासक्रमही ऑनलाइन किंवा मुक्त व दुरस्थ पध्दतीने करण्यास बंदी घालण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा