जुन्यापुराण्या 1300 रेडिओंचा संग्रह!

अमरोहा : प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद असतो. काही जण या छंदासाठी शक्य तितका वेळ देतात तर काही जण यासाठी इतके झपाटलेले असतात की, ते आपले पूर्ण आयुष्यच त्या छंदासाठी समर्पित करतात. उत्तर प्रदेशमधील मोहल्ला नाईपुरा येथील रहिवासी राम सिंह बौद्ध यांनीही रेडिओ संग्रहाचा छंद जोपासण्यासाठी पूर्ण आयुष्य वेचले आहे.
राम सिंह बौद्ध यांनी 2016 मध्ये वरिष्ठ निरीक्षकपदावरून निवृत्त झाल्यानंतर पाच वर्षे ग्राहक न्यायालयात सचिव म्हणून देखील काम केले. नोकरीत असताना त्यांना रेडिओ ऐकण्याचा छंद होता. याच छंदासाठी त्यांनी 2010 पासून रेडिओंचा संग्रह करण्यास सुरुवात केली. आता त्यांच्या संग्रहालयात 1300 पेक्षा अधिक रेडिओ समाविष्ट आहेत.
देशातील अन्य कोणाकडे खचितच इतक्या रेडिओंचा संग्रह असेल, असे राम सिंह आपल्या छंदाबद्दल बोलताना म्हणतात. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळावे, यासाठीही त्यांचे प्रयत्न आहेत. मुरादाबाद, मेरठ, कालपी, कानपूर आदी शहरातील स्क्रॅप विक्रेत्यांशी संपर्क साधत त्यांनी अडगळीत पडलेले रेडिओही एकत्रित केले. त्यांच्या संग्रहालयात टेबल रेडिओ, पॉकेट रेडिओ व बॉल रेडिओ देखील समाविष्ट आहे.