सांगलीत द. भा. जैन सभेचे आज अधिवेशन | पुढारी

सांगलीत द. भा. जैन सभेचे आज अधिवेशन

सांगली : पुढारी वृत्तसेवा दक्षिण भारत जैन सभेचे शंभरावे अधिवेशन आज सांगलीत होणार आहे. येथील नेमीनाथनगरमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या अधिवेशनास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन सहभागी होणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील आणि कर्नाटकातील आमदार, खासदार आणि कर्नाटक मंत्रिमंडळातील काही मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

नांदणी पिठाचे प. पू. स्वस्तिश्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वीमीजी आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते ध्वजारोहन करून सभेच्या शंभराव्या महाअधिवेशनाला शनिवारी सुरूवात करण्यात आली. दिवसभरही विविध धार्मिक कार्यक्रम सांगलीत सुरू होते.

रविवारी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमास सुरूवात होणार आहे. श्रीमतीबाई कळंत्रे श्राविकाश्रम नूतन वास्तू व शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग नूतन वास्तूचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कार तसेच (स्व.) बापूसाहेब बोरगावे यांना (मरणोत्तर) जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 20 व्या शतकातील शांतिसागरजी महाराज जीवन चरित्र धर्मसाम्राज्य नायक कन्नड व मराठी ग्रंथ प्रकाशन, दक्षिण भारत जैन सभा दर्शन या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता दक्षिण भारत जैन शताब्दी महाअधिवेशन (त्रेवार्षिक) नोटीसप्रमाणे कामकाज व समाजातील विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब जि. पाटील, कार्याध्यक्ष व माजी महापौर सुरेश पाटील, मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील, उपाध्यक्ष माधव डोर्ले, खजिनदार सागर वडगावे, सचिव प्रा. एन. डी. बिरनाळे, सहखजिनदार पा. पा. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या अधिवेशनाचे संचलन करीत आहेत.

Back to top button