

पुणे : पुढारी वृत्तसेवा
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या जोडीला आता मराठी चित्रपटही हाउसफुल्ल होत असून, मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटांसह इतर विषयांवर प्रकाशझोत टाकणारे मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. गेली दोन वर्षे रखडलेले मराठी चित्रपट एका मागून एक प्रदर्शित होत असून, यामुळे मल्टिप्लेक्समध्ये होणार्या मराठी चित्रपटांचे शोही वाढले आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षक पुन्हा चित्रपटांकडे वळला असून, मराठी चित्रपटही कमाई करत आहेत.
दरवर्षी साधारणपणे 100 मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. कोरोनाच्या दोन वर्षांत अनेक मराठी चित्रपटांचे प्रदर्शन रखडले. त्यामुळे कोरोनाची स्थिती सुरळीत झाल्यानंतर मराठी चित्रपटही प्रदर्शित होत असून, नवीन मराठी चित्रपटांना प्रतिसाद आहे. वेगळ्या धाटणीचे विषय, वेगळे संगीत, समर्पक कथानक अन् कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे मराठी चित्रपट गाजत आहेत. खासकरून ऐतिहासिक चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव प्रकाश चाफळकर म्हणाले, 'दरवर्षी 100 मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. गेल्या दोन वर्षांत अनेक मराठी चित्रपटांचे प्रदर्शन रखडले, पण टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत असून, मल्टिप्लेक्समध्ये हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांसह मराठी चित्रपटांनाही स्क्रीन दिले जात आहेत. ऐतिहासिक विषयांवरील मराठी चित्रपटांना चांगला प्रतिसाद आहे.'
चांगले चित्रपट येत असल्याने प्रेक्षकही गर्दी करत आहेत. प्रेक्षकांच्या मनातील भीतीही ओसरली आहे. काही चित्रपटांना तर हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. आम्हा मल्टिप्लेक्स चालकांनाही त्याचा फायदा होत आहे. मराठी चित्रपट निर्मातेही खूश आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सध्याच्या घडीला मल्टिप्लेक्स चालक खूश आहेत. चित्रपटांच्या ऑनलाइन-ऑफलाइन बुकिंगलाही प्रतिसाद आहे. त्यामुळे आधी मल्टिप्लेक्सकडे पाठ फिरवणारा मराठी प्रेक्षक मल्टिप्लेक्सकडे वळला आहे. मल्टिप्लेक्सचे अर्थचक्र रुळावर आले आहे आणि मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्माते -दिग्दर्शक सरसावत आहेत.