पुणे : पणदरे येथे ई- बाईकचा बर्निंग थरार | पुढारी

पुणे : पणदरे येथे ई- बाईकचा बर्निंग थरार

शिवनगर; पुढारी वृत्तसेवा : पणदरे (ता. बारामती) येथे बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी ई- बाईकने बुधवारी सकाळी अचानक पेट घेतला. यामध्ये ई बाईक पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या बर्निंग थरारामुळे काही काळ परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

पवईमाळ (ता. बारामती) येथील शशिकांत लक्ष्मण जगताप यांनी दोन महिन्यापूर्वी बारामती येथील एका ई- बाईकच्या शोरूममधून जवळपास ८० हजार रुपये मोजून गाडी खरेदी केली होती. बुधवारी (दि.११) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान जगताप हे पणदरे बाजारपेठेतील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गाडी हॉटेलच्या समोर पार्क करून आत गेले. याच दरम्यान गाडीमधून अचानक धूर निघून काही वेळातच गाडीने पेट घेतला, आणि बघता- बघता गाडी जळून खाक झाली.

याबाबत प्राथमिक माहिती घेतली असता गाडीच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन गाडीने पेट घेतला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान याबाबत संबधित शोरूमशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली असल्याचे गाडी मालक जगताप यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button