सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिकेची निवडणूक तीनसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घ्यावी, असा निर्णय राज्य सरकारकडून घेतला होता. पालिकेने आयोगाच्या सूचनेनुसार त्यावर हरकती, सूचना मागवून सुनावणीचीही प्रक्रिया केली होती. प्रभाग रचनेचा अहवाल आधी निवडणूक आयोगाला व नंतर राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. आता प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. 15 मेपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
प्रभाग रचनेसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवडणूक आयोगाने बुधवारी 11 मे रोजी बोलवले आहे. त्यांच्या चर्चेनंतरच पुढील दिशा लवकरच ठरणार आहे. महापालिका निवडणूक प्रक्रियेची माहिती प्रशासनाने निवडणूक आयोग, शासनाला सादर केली. त्यामुळे महापालिका निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहे.
आयोगाने राज्यातील अन्य महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांकडून माहिती मागितली आहे. मात्र महापालिकेने 10 मार्च 2022 पर्यंतची माहिती आधीच सादर केल्याने प्रशासन नवीन आदेशाची वाट पाहत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय नको यासाठी सर्व राजकीय पक्ष एकवटले होते. मात्र निवडणुकांवरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला भाजपने घेरले आहे. अशा परिस्थितीत ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने नवीन विधेयकाद्वारे कायदा मंजूर केला आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले. निवडणूक आयोगाच्या आदेशाने यापूर्वी झालेली बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द केली होती.